पुणे : टोळक्याचा व्यावसायिकावर खुनी हल्ला; दुकानाची तोडफोड करत परिसरात घातला राडा | पुढारी

पुणे : टोळक्याचा व्यावसायिकावर खुनी हल्ला; दुकानाची तोडफोड करत परिसरात घातला राडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून बारा ते तेरा जणांच्या टोळक्याने एका व्यावसायिकावर खुनी हल्ला करून दगडाने झेरॉक्सच्या दुकानातील मशीन, स्टेशनरी, संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली. तसेच परिसरात दुचाकीवर फिरून मोठ्याने आरडा- ओरडा करत दहशत निर्माण केली. याप्रकरणी संदीप विलासराव तुपे (वय 40, रा. सूस रोड, बालाजी चौक, पाषाण) यांनी चतुःशृंगी) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी राज मानवतकर (वय 20), चंदू खेतावत (वय 20), किशोर गोपी मेघावत (वय 20), नितीन ऊर्फ बया मेघावत (वय 20), नितीन वैद्य (वय 25, राहणार सर्व लमाणतांडा पाषाण) व इतर सहा ते आठ साथीदारांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नितीन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना बुधवारी रात्री 9 च्या सुमारास साईचौक पाषाण येथील रॉयल कॉपिअर्सच्या झेरॉक्स दुकानात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप तुपे यांचे झेरॉक्सचे दुकान आहे. तुपे व आरोपी यांच्यात पूर्वी भांडणे झाली होती. त्याचाच राग मनात धरून राज मानवतकर हा आपल्या साथीदारांना घेऊन तुपे यांच्या झेरॉक्सच्या दुकानात आला. त्यांनी तुपे यांच्या दुकानातील साहित्याची दगडाने तोडफोड करून त्यांना मारहाण केली. दरम्यान, ‘मानवतकर, तुला आता सोडणार नाही’, असे म्हणून तुपे यांना ठार करण्याच्या हेतूने दगड डोक्यात घालून गंभीर जखमी केले. आरोपींनी केलेल्या तोडफोडीत तुपे यांच्या दुकानातील संगणक, झेरॉक्स मशिन, स्टेशनरी साहित्य, फर्निचरचे नुकसान झाले आहे.

 

Back to top button