नऊ वर्षे डेटिंग; शंभरीतील आजी-आजोबांचे लग्न! | पुढारी

नऊ वर्षे डेटिंग; शंभरीतील आजी-आजोबांचे लग्न!

वॉशिंग्टन : प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असते, असे म्हटले जाते. शिवाय प्रेमाच्या बाबतीतच बोलायचे, तर प्रेम हे आंधळे असते, असेही म्हटले जाते. प्रेमाला वयाचेही बंधन असत नाही. सध्याच्या जगात तर प्रेमाची आणि प्रेमप्रकरणांची भन्नाट उदाहरणे पाहायला मिळतात. लग्न करायचं म्हटलं की, बरेच लोक आधी डेटिंग करतात. म्हणजे एकमेकांना भेटतात, एकमेकांना ओळखून घेतात. हल्ली अशीच बरीच लग्नं ठरतात. आता तर अगदी शंभरीतील आजी-आजोबाही याला अपवाद ठरले नाही. तब्बल 9 वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी या वयात लग्न केलं आहे.

अमेरिकेत राहणारे मार्जोरी फटरमन आणि बर्नी लिटमन यांचं वयाच्या शंभरीत लग्न झालं आहे. मार्जोरी 102 वर्षांच्या आहेत, तर बर्नी 100 वर्षांचे. दोघंही एकमेकांना 9 वर्षांपासून डेट करत होते. त्यांच्या लग्नाच्या बातमीमुळे घरातल्या सर्वांनाच आनंद झाला. ज्यू क्रोनिकलच्या वृत्तानुसार लिटमनची नात सारा म्हणाली की, तिच्या आजोबांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यावर कुटुंब आश्चर्यचकित झालं. सगळ्यांना खूप आनंद झाला. लग्नाला कायदेशीर दर्जा मिळावा, अशी आजोबांची इच्छा होती.

त्यामुळे 19 मे रोजी लग्न झाल्यानंतर त्यांनी लग्नाची नोंदणी करून घेतली. लिटमन म्हणाले, तुम्ही कधी कुणाला भेटता आणि त्याच्या प्रेमात पडता, यावर तुमचं नियंत्रण नाही. म्हणूनच आम्ही आधुनिक डेटिंग अप्सऐवजी पारंपरिक रोमान्सची आवड कायम ठेवली. आम्ही एकत्र भेटायचो, खूप बोलायचे, चांगल्या गोष्टी शेअर करायचो. आम्ही कधी प्रेमात पडलो आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतला, हे आम्हाला कळलंही नाही.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार सर्वात वयस्कर विवाहित जोडप्याचा सध्याचा विश्वविक्रम ब्रिटनच्या डोरीन आणि जॉर्ज किर्बीच्या नावावर आहे, ज्यांचं लग्न 2015 साली झालं होतं. त्यावेळी दोघांचं एकूण वय 194 वर्षे 279 दिवस होतं. त्यानुसार मार्जोरी आणि बर्नी लिटमन यांनी वयाच्या एकत्रित 202 व्या वर्षी लग्न केलं. त्यामुळे आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रस्ताव पाठवला आहे, असं सारानं सांगितलं.

Back to top button