दक्षिण चीन समुद्रात 80 वर्षांपूर्वीची अमेरिकन पाणबुडी | पुढारी

दक्षिण चीन समुद्रात 80 वर्षांपूर्वीची अमेरिकन पाणबुडी

वॉशिंग्टन : दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील अनेक बॉम्ब, शस्त्रे आणि विमान तसेच पाणबुड्यांचे अवशेषही सापडत असतात. आता अमेरिकेतील सर्सिद्ध पाणबुडीपैकी एक असलेल्या ‘यूएसएस हार्डर’चे अवशेष तब्बल 80 वर्षांनंतर दक्षिण चीन समुद्रात सापडले आहेत. दुसर्‍या महायुद्धात 29 ऑगस्ट 1944 रोजी शत्रूच्या हल्ल्यात ती बुडाली होती. यात 79 क्रू मेंबर्स होते, ज्यांचा मृत्यू झाला. फिलिपाईन्समधील लुझोन बेटाच्या 3 हजार फूट खाली पाणबुडीचे अवशेष सापडले.

अमेरिकेच्या नेव्ही हिस्ट्री हेरिटेज कमांडरने ही माहिती दिली. ते म्हणाले की, हल्ल्यानंतर 80 वर्षे बुडीत असूनही बहुतांश पाणबुडी अजूनही शाबूत आहे. अमेरिकन मीडिया सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, बुडण्यापूर्वी अमेरिका या पाणबुडीचा वापर जपानी सैन्याच्या ताब्यातून फिलिपाईन्सला परत घेण्यासाठी करत होती. ही तीच अमेरिकन पाणबुडी होती, जिने दुसर्‍या महायुद्धात सर्वाधिक जपानी युद्धनौका बुडवल्या होत्या. त्याच्या शेवटच्या मोहिमेदरम्यान, यूएसएस हार्डरने 3 जपानी युद्धनौका बुडवल्या. यानंतर, पुढील 4 दिवसांत त्याने आणखी दोन युद्धनौका मोठ्या प्रमाणात नष्ट केल्या.

यानंतर जपानी सैन्याला त्यांची युद्ध योजना बदलण्यास भाग पाडले गेले. हे त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले.24 ऑगस्ट 1944 रोजी, हार्डरने जपानी एस्कॉर्ट जहाज ‘सीडी-22’ शी लढाईदरम्यान 3 टॉर्पेडो उडवले. मात्र, त्यांचे लक्ष्य चुकले. यानंतर जपानी जहाजाने ही पाणबुडी बुडवली. सीएनएनच्या म्हणण्यानुसार, युद्धादरम्यान पहिल्या 4 गस्तीमध्ये या पाणबुडीने 14 जपानी युद्धनौका आणि व्यापारी जहाजे नष्ट केली होती.

काही महिन्यांच्या शोधानंतर, यूएसएस हार्डरला 2 जानेवारी 1945 रोजी बेपत्ता घोषित करण्यात आले. यानंतर, 20 जानेवारीला ती यूएस नेव्हीच्या रजिस्टरमधूनदेखील काढून टाकण्यात आली. खरेतर, 2 महायुद्धात अमेरिका आणि जपान यांच्यातील लढाईतील प्रमुख मुद्द्यांपैकी एक फिलिपिन्स होता. ‘लॉस्ट 52 प्रोजेक्ट’ अंतर्गत यूएसएस हार्डरचा शोध घेण्यात आला आहे. टिब्युरॉन सबसी कंपनीचे सीईओ टिम टेलर यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे. युद्धादरम्यान बुडालेल्या 52 अमेरिकन पाणबुड्या शोधण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. या कंपनीने आतापर्यंत दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील 6 पाणबुड्या शोधल्या आहेत.

Back to top button