पुणे : शिंदे-फडणवीस, मोदी-शहांचे हस्तक, नाना पटोलेंची जहरी टीका | पुढारी

पुणे : शिंदे-फडणवीस, मोदी-शहांचे हस्तक, नाना पटोलेंची जहरी टीका

पुणे :  पुढारी वृत्तसेवा : वेदांता-फॉक्सवॉन प्रकल्प गुजरातला घालवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोदी-शहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचे व येथील जनतेचे काहीही देणे घेणे नाही, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी पुण्यात केली. दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे घेवून जाण्याची वल्गना करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 या कालावधीत राज्यातील किती संस्था व प्रकल्प गुजरातला गेले याची यादी द्यावी, असेही आव्हानही पटोले यांनी यावेळी दिले. काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव , पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, ओबीसी सेवचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, माजी आमदार रमेश बागवे, दिप्ती चवधरी, मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यातील अनेक संस्था आणि प्रकल्प गुजरातला गेले. ऐवढेच नाही राज्याचे पाणी सुद्ध त्यांनी गुजरातला दिले. आता तेच फडणवीस दोन वर्षात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे नेण्याची भाषा करत आहेत. ते मुख्यमंत्री असताना काय काय गुजरातला गेले याची यादी त्यांनी द्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नाच गाण्यात रंगले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यात काहीच अर्थ नाही. तसेच विखे पाटील भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपमध्ये गेल्याचा आरोपही पटोले यांनी केला.

नोटबंदीच्या काळात देशात जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. यातून मिळालेल्या पैशातून भाजपने देशभरात जागा घेतल्या. याच पैशातून आमदार विकत घेतले जात आहेत. भय आणि भ्रष्टाचाराचे राजकारण करून लोकशाही विकत घेण्याचे काम केले जात आहे. कोणाच्या मनात काय सुरू आहे, हे कोणीही ओळखू शकत नाही. त्यामुळे काँग्रसचे कोण नेते भाजपमध्ये जातील, हे सांगता येणार नाही. आम्ही मात्र देश वाचवण्याचे काम करू. काँग्रेसने देश उभा केला, म्हणून भाजप तो विकत आहे, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

ओबीसींची जातीनिहाय जनगणना  करा 
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी नेमण्यात आलेल्या भांटीया आयोगाने आडनावावरून माहिती संकलित केली. आडनावावरून व्यक्तीची जात समजत नाही. एकाच आडनाव विविध जातींमध्ये असून शकते. त्यामुळे भांटीया आयोगाने संकलित केलेली माहिती चुकीची आहे. ओबीसींना न्याय मिळण्यासाठी केंद्र सरकारने ओबीसींची जातीनिहास जनगनणा करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

पंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत, असे सांगून भाजप देशातील ओबीसींची फसवणुक करत आहे. खोटे सांगून ओबीसींची मते मिळवत आहे. मात्र, मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत, याचे कागदी पुरावे आमच्याकडे आहेत. हे पुरावे काँग्रेस पक्ष लवकरच देशासमोर आणेल, असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

भारत जोडो नंतर संविधान बचाव 
भाजप व मोदी सरकार जाती, धर्म आणि भाषेवरून समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. ईडी, सीबीआय, आयकर आणि माध्यमांचा गैरवापर करून देशाचे संविधान मोडीत काढण्याचे काम केले जात आहे. महागाई आणि भ्रष्टाचारापासून नागरिकांचे लक्ष दुसरीकडेच नेले जात आहे. या सर्व गोष्टी नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या यात्रेनंतर काँग्रेस देशात संविधान बचाव अभियान राबविणार असल्याचे ओबीसी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव यांनी सांगितले.

Back to top button