स्वच्छतेसाठी नव्या आयुक्तांचा नवा पॅटर्न, ‘पीसीएमसी स्वच्छता लीग’साठी पावणेपाच लाखांचे टी शर्ट, टोप्या | पुढारी

स्वच्छतेसाठी नव्या आयुक्तांचा नवा पॅटर्न, ‘पीसीएमसी स्वच्छता लीग’साठी पावणेपाच लाखांचे टी शर्ट, टोप्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी नव्या आयुक्तांनी नवा पॅटर्न सुरू केला आहे. त्यासाठी नवा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर नियुक्त करून शहर स्वच्छतेचा श्रीगणेशा केला आहे. त्यातून त्यांनी आपली कामाची पद्धत वेगळी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पीसीएमसी स्वच्छता लीग या नव्या मोहिमेसाठी 1 हजार टी शर्ट व टोप्यांसाठी पावणेपाच लाखांचा खर्च करण्यात आला आहे.

‘स्वच्छाग्रह’मोहिमेवरही झाला मोठा खर्च
तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी इंदूर शहराच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छाग्रह ही मोहीम मोठा गाजावाजा करीत सुरू केली. या स्वच्छता मोहिमेवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. इंदूरसह इतर काही शहरांच्या अभ्यास दौर्‍यावर अधिकार्‍यांना पाठविण्यात आले. जनजागृतीसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नेमणूक करण्यात आली. प्लॉगेथॉन स्वच्छता फेरी, जनजागृतीसाठी फ्लेक्सबाजी, बोधचिन्हांवर मोठा खर्च करण्यात आला. रस्ते, पदपथ, उड्डाण पुलाची रंगरंगोटी करण्यात आली. रस्ते व चौक सुशोभीकरणासाठी रोपांसह कुंड्या उभारण्यात आल्या. अनधिकृत जाहिरात होर्डिंग हटविण्यात आले. एका रात्रीत शहरातील सर्व कचराकुंड्या हटविण्यात आल्या. घराघरांतून ओला व सुका कचरा देण्यासाठी जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्था नेमण्यात आल्या. नागरिकांनी रस्त्यांवर कचरा टाकू नये, म्हणून फलक लावण्यात आले. कारवाईसाठी ग्रीनमार्शल पथकाची नियुक्ती करण्यात आली. या सर्व कामासाठी खासगी सल्लागार नेमण्यात आले. या कामांसाठी सर्व विभागाच्या अधिकार्‍यांवर जबाबदारी सोपविण्यात आली; तसेच अनेकदा बैठका घेऊन आढावा सत्राचा धडाका लावला होता. स्वच्छाग्रह मोहिमेवर पालिकेकडून पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला.

नवीन उपक्रम पीसीएमसी पायोनियर
त्याच पद्धतीने नवे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शहर स्वच्छतेसाठी ‘पीसीएमसी स्वच्छता लीग’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचे ते स्वत: कर्णधार असून, त्या उपक्रमास पीसीएमसी पायोनियर असे नाव देण्यात आले आहे. त्यासाठी खासगी सल्लागार संस्थाही नियुक्त करण्यात आली आहे. नव्याने बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महात्मा गांधी जयंतीपर्यंत स्वच्छता जनजागृती
स्वच्छता जनजागृती मोहीम शनिवार (दि.17) पासून महात्मा गांधी जयंती, 2 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी 1 हजार 600 टी शर्ट व टोप्या छापून घेण्यात आल्या आहेत. एका टी शर्टचा दर 240 आणि टोपीचा दर 51 रुपये आहेत. त्यासाठी एकूण 4 लाख 65 हजारांचा खर्च झाला आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 200 टी शर्ट व टोप्या दिल्या जाणार आहेत. तसेच, मोहिमेच्या जनजागृती व प्रसिद्धीसाठी तसेच, फ्लेक्स, फलकांवर आणि इतर कार्यक्रमांसाठी मोठा खर्च केला जाणार आहे. नवीन आयुक्त सिंह हे ही मागील आयुक्तांप्रमाणे स्वच्छतेवर मोठा खर्च करणार या कृतीवरून दिसत आहे.

शहर स्वच्छतेसाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा
पिंपरी-चिंचवड शहरात तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी स्वच्छता चळवळ सुरू केली. ती यापुढेही कायम राहणार आहे. शहर स्वच्छ ठेवणे हे सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. स्वच्छता मोहिमेसाठी नागरिकांचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. रस्त्यांवर किंवा उघड्यावर कचरा न टाकता तो घंटागाडीतच टाकला पाहिजे. ओला व सुका कचरा असा वेगळा केला जावा, असे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.

Back to top button