देशाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून युवकांनी मतदान करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

देशाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून युवकांनी मतदान करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राजकुमार चौगुले

किणी; पुढारी वृत्तसेवा : देशभक्ती, देशाचा विकास आणि देशाचा नेता निवडण्याची वेळ आहे. यासाठी देशाचे भवितव्य डोळ्यासमोर ठेऊन युवकांनी मतदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाठार तर्फ वडगाव येथील युवा संवाद कार्यक्रमात बोलताना केले.

वाठार तर्फ वडगांव येथील अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खा.धैर्यशील माने, विकास माने, समित कदम, अशोकराव माने, मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव माने ग्रुपचे अध्यक्ष विजयसिंह माने होते. स्वागत विजयसिंह माने यांनी केले, दिपप्रज्वलन शिवतेज देवणे, कुमार पाटील, उन्नती हिंगडे, साक्षी चौगुले या विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे युवक-युवतींशी संवाद साधताना म्हणाले ‘आपला देश युवकांचा असुन ६५ टक्के नागरिक हे ३५ वर्षाखालील आहेत. यामुळे हा देश युवकांचा देश म्हणून ओळखला जात आहे. पंतप्रधान युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत. देशाला महासत्तेकडे न्यायचे आहे यात तरुणांची भूमिका महत्वाची आहे. आपला देश मजबूर नाही तर मजबूत आहे. हे मोदीजीनी दाखवून दिले आहे’.

‘जिद्द, चिकाटी, मेहनत या जोरावर क्रांती घडविण्याची तरुणाईत ताकद आहे. शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती घडवा. आपले रोल मॉडेल म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, सचिन तेंडूलकर यांच्याकडे पाहतो. एकही दिवस सुट्टी न घेतल्यानेच मोदींचा सन्मान जगभरात होत आहे. यामुळेच आज भारत बोलतो आणि जग ऐकते असा आदर जगभर पंतप्रधान मोदींनी निर्माण केला आहे. युवकांसाठी नवीन तंत्रज्ञानास प्राधान्य देताना स्टार्टअप सारख्या योजना निर्माण करुन नोकऱ्यापेक्षा नोकऱ्या देणारे उद्योजक तयार करण्याची भूमिका पंतप्रधानांनी घेतली आहे.

यावेळी उपस्थित युवक, युवतीनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना कोल्हापूर परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या येतील यासाठीचे करार दाहोस येथे झालेल्या परिषदेत करण्यात आले आहेत. अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, एआय तंत्रज्ञानामुळे रोजगार निर्मिती घटणार ही भिती युवकांनी काढून टाकावी. यामुळे एआय तंत्रज्ञान तयार करण्यासाठी संशोधन आणि विकास या क्षेत्रात रोजगाराची संधी वाढणार आहेत. पूर्वीपेक्षा उद्योगांची निर्मिती करण्यासाठी सध्याचे सरकार गतीमान झाले असून उद्योजकांना रेड कार्पेट टाकून एक खिडकी योजनेद्वारे उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

याबरोबरच शासन आपल्या दारी, विद्यार्थ्यांना मोफत पास योजना, नागरिकांच्या मदतीसाठी असणाऱ्या हेल्पलाईन अधिक सक्षम करणे, १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुप्पट करणे, मोफत एसटी प्रवासासाठी ज्येष्ठ नागरीकांची वयोमर्यादा ७५ वरुन ६५ करणे, ग्रामिण भागाची रस्त्यांचे जाळे वाढविणे याबाबतचे सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले.यावेळी दर्शना पाटील, वैष्णवी पाटील, शौणक पाडळीकर , प्रेरणा खोत, श्रावणी माळी, दीपक शितल वाघ, आरती पाटील या युवा विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारुन बोलते केलेअशोकराव माने ग्रुपचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

खासदार धैर्यशील माने यांनी आभार मानले.कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या मनिषा माने, अंबपच्या सरपंच दिप्ती माने, झाकीर भालदार, उद्योजक शरद बेनाडे, उपप्राचार्य प्रविण घेवारी, डॉ. जयदिप शिंदे, प्रा. संग्राम दोपारे, प्रा. एस. एस. रांजने आदींसह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्वसामान्य जनता हीच माझी ऊर्जा

आठवड्यातील सातही दिवस अहोरात्र काम करण्याच्या कार्यपध्दतीबद्दल प्रश्न विचारताना अशोकराव माने ग्रुपचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी ही उर्जा तुम्हाला कोठून मिळते असे विचारले असता माझे कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची जनता हे माझे प्रेरणास्त्रोत असून त्यांचे काम करीत असताना कधीही थकल्यासारखे वाटत नाही. उलट प्रेरणाच मिळते यामुळे हीच माझी ऊर्जा आहे असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली सेल्फी

.युवा संवाद कार्यक्रमात विद्यार्थी विद्यार्थिनीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी साधलेल्या कार्यक्रमात युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला यामुळे भारावलेल्या मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून उपस्थित युवकांबरोबर सेल्फी घेतली

Back to top button