रशियाने खेळली ‘वॉटर बॉम्ब’ युद्धनीतीची चाल! युक्रेनच्या धरणांवर केले क्षेपणास्त्र हल्ले | पुढारी

रशियाने खेळली ‘वॉटर बॉम्ब’ युद्धनीतीची चाल! युक्रेनच्या धरणांवर केले क्षेपणास्त्र हल्ले

पुढारी ऑनलाईन डेस्क : Russia strikes water system of Ukraine : रशियाने या वर्षी फेब्रुवारीमध्ये युक्रेनवर हल्ला केला होता. गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात युक्रेन खंबीरपणे रशियाला तोंड देत आहे. युक्रेन कोणत्याही परिस्थितीत रशियाच्या दबावापुढे झुकायला तयार नाही. युक्रेनी सैनिकांनी धैर्य आणि लढाऊ कौशल्याच्या बळावर मागील आठवड्यात रशियन सैन्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. युक्रेनी सैन्याच्या प्रतिकारामुळे खार्किव भागातून रशियन सैन्याला माघार घ्यावी लागली. आता युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दावा केला आहे की गेल्या 12 दिवसांत त्यांच्या सैन्याने रशियाच्या ताब्यातून सुमारे 6,000 चौरस किलोमीटरचा भूभाग परत घेतला आहे.

युक्रेनच्या लष्कराने गेल्या काही दिवसांत खार्किव आणि इतर अनेक शहरे रशियन ताब्यापासून मुक्त केली असली तरी आता या शहरांमधूनही भयावह चित्र समोर येत आहे. रशियन ताब्यापासून नुकतीच सुटका केलेल्या इझियम शहराजवळ एक सामूहिक कबर सापडली आहे. या सामूहिक कबरीत 440 हून अधिक मृतदेह सापडल्याचा दावा केला जात आहे. (Russia strikes water system of Ukraine)

युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, रशियन सैन्याकडून परत मिळवलेली शहरे आणि गावे उद्ध्वस्त झाली आहेत. तर एक प्रमुख शहर क्रेमलिनच्या सैन्याने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे त्याच्या जलप्रणालीचे नुकसान टाळण्यासाठी संघर्ष करत आहे. क्रिवी रिह असे त्या शहराचे नाव आहे. मध्य युक्रेनमधील हे सर्वात मोठे शहर आहे. युद्धपूर्व काळात या शहराची लोकसंख्या 6 लाख 50 हजार होती. पण क्रेमलिनच्या सैन्याने क्रिवी रिह शहरावर बुधवारी (दि.14) आठ क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला. यावेळी येथील धरणाला लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली. (Russia strikes water system of Ukraine)

झेलेन्स्की यांनी गुरुवारी एक व्हिडिओ प्रसारीत केला. त्यात त्यांनी युद्धातील विविध विषयांची माहिती दिली. काराचुनोव्ह जलाशय धरणावर हल्ला झाल्याचे सांगत त्यांनी रशियाला ‘दहशतवादी राज्य’ म्हणून संबोधले. जलप्रणालीला “लष्करी मूल्य नाही” आणि शेकडो हजारो नागरिक दररोज त्यावर अवलंबून असतात, असे ते म्हणाले. रशियाच्या या कुटनितीमुळे युक्रेनमधील जनता पाण्याविना तडफडेल अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. (Russia strikes water system of Ukraine)

Back to top button