बारामतीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातही भाजपची मोर्चेबांधणी | पुढारी

बारामतीसह शिरूर लोकसभा मतदारसंघातही भाजपची मोर्चेबांधणी

सुषमा नेहरकर-शिंदे : 

पुणे : बारामतीपाठोपाठ भारतीय जनता पक्षाने शिरूर लोकसभा मतदारसंघातदेखील जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग 14 ते 16 सप्टेंबर अशा तीन दिवसांच्या शिरूर मतदारसंघाच्या दौर्‍यावर येत आहेत.
भाजपच्या ‘मिशन 2024‘ अंतर्गत लोकसभा प्रवास योजना आखण्यात आली आहे. या तीन दिवसांच्या दौर्‍यात मतदारसंघातील डॉक्टर, वकील, व्यावसायिक यांसारख्या विविध घटकांना भेटणे, नवमतदार ‘टार्गेट’ करून पक्षाची ध्येय धोरणे सांगणे, केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्यात आदी विविध गोष्टीचा आढावा घेण्यात येणार आहे.

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. यामध्ये बारामतीसोबतच आता भाजपने शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. बारामतीपेक्षादेखील भाजपसाठी आता शिरूर लोकसभा मतदारसंघ अधिक सोपा झाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजपने आपले अस्तित्व निर्माण केले असून, फडणवीस सरकाराच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात या भागात भाजपने आपली पाळेमुळे अधिक भक्कम केली आहेत.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात भाजपचे पारंपरिक कार्यकर्ते कार्यरत होतेच. आता शिवसेनेच्या नेत्या व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने जुन्नरमध्ये भाजप अधिकच भक्कम झाला आहे. शिरूर मतदारसंघात तुलनेत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला स्वत:चे अस्तित्वात निर्माण करावे लागेल. परंतु येथे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख नेते शिंदे गटात सामील झाल्याने भाजपला ताकद मिळू शकते. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख आणि शरद बुट्टे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आपले अस्तित्व निर्माण केले आहे.

शिरूर विधानसभा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून, येथे दिवंगत नेते बाबूराव पाचर्णे हे भाजपचे आमदारदेखील राहिले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा बँक संचालक प्रदीप कंद याच्या रूपाने भाजपला चांगली ताकद मिळाली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार महेश लांडगे यांचाच मतदारसंघ असून, भविष्यात लांडगे हेच शिरूरमधून भाजपचे उमेदवार असू शकतात. या शिवाय हडपसर हा मतदारसंघदेखील भाजपचे वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. येथे भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनी मतदारसंघाची बांधणी केली आहे. यामुळेच सर्व गोष्टींचा विचार करता बारामतीच्या तुलनेत भाजपसाठी शिरूर मतदारसंघ अधिक सोपा मतदारसंघ मानला जातो.

पक्षाच्या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग यांच्या तीन दिवसांच्या शिरूर मतदारसंघाच्या दौर्‍यात बुथनुसार नियोजनाची पाहणी, लोकसभा समितीच्या नियोजनाचा आढावा, संघटनात्मक बांधणीसाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, केंद्राच्या योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद, भाजपच्या पितृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी, मंदिर, हुतात्मा राजगुरू यांच्या वाड्याला भेट, वारकरी पंथाच्या मान्यवरांच्या गाठीभेटी, जुन्नरमध्ये आदिवासींना भेट, शासकीय अधिकार्‍यांबरोबर आढावा बैठका आयोजित केल्या आहेत.
                                           – महेश लांडगे, भाजप आमदार व समन्वयक

Back to top button