दिव्यांग मुलीवर तरुणाचा अत्याचार, कर्जत तालुक्यातील घटना | पुढारी

दिव्यांग मुलीवर तरुणाचा अत्याचार, कर्जत तालुक्यातील घटना

नगर : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील एका गावातील दिव्यांग मुलीवर एका नातेवाईक तरुणानेच अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नगरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून शून्य क्रमांकाने मिरजगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील एका गावामध्ये पीडित दिव्यांग मुलगी आणि आरोपीचे घर शेजारी आहे. साधारण चार महिन्यांपूर्वी पीडितेच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आरोपींनी तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुटुंबीयांना माहिती नव्हती.

मात्र, अचानक पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने आई-वडिलांनी तिला नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर पीडित दिव्यांग मुलगी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित वैद्यकीय अधिकार्‍यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात कळविले. कोतवाली पोलिसांनी पीडित दिव्यांग मुलगी व आई-वडिलांना पोलिस ठाण्यात आणले. पीडितेची चौकशी केली असता घराशेजारी राहणार्‍या एका नातेवाईक तरुणाने अत्याचार केल्याचे तिने सांगितले. याबाबत पीडित दिव्यांग मुलीच्या फिर्यादीवरून नातेवाईक आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तो गुन्हा शून्य क्रमांकाने मिरजगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला असून, मिरजगाव पोलिस गुन्ह्याचा तपास करीत आहेत. दरम्यान, पीडित दिव्यांग मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Back to top button