नाशिक : दोन महिन्यांत 74 बेपत्ता, अपहृतांचा शोध | पुढारी

नाशिक : दोन महिन्यांत 74 बेपत्ता, अपहृतांचा शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिसांच्या निर्भयाच्या चार पथकांनी दोन महिन्यांत शहरातून बेपत्ता व अपहरण झालेल्या 74 महिला, मुले, मुली व पुरुषांचा शोध लावला आहे. पथकाने एका महिन्यात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे पाच गुन्हे उघडकीस आणून त्यांचा शोध घेतला आहे. त्याचप्रमाणे पथकाने महाराष्ट्र पोलिस कायदा कलमप्रमाणे 131 कारवाया केल्या आहेत.

पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार शहर आयुक्तालयात 8 जुलैपासून चार निर्भया पथके कार्यान्वित करून त्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्यात पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिकरोड अशा चार निर्भया विभाग पथकांचा समावेश आहे. एका पथकात प्रत्येकी दोन टीम असून, त्यात दोन महिला पोलिस अंमलदार व पुरुष पोलिस अंमलदार तसेच एक महिला पोलिस उपनिरीक्षक कार्यरत आहेत. पथकाच्या नोडल अधिकारी म्हणून पोलिस मुख्यालयाच्या उपआयुक्त पौर्णिमा चौघुले या आहेत. चारही विभागीय निर्भया पथकांनी जुलै महिन्यात 21 तर ऑगस्ट महिन्यात 53 असे एकूण 74 बेपत्ता व अपहरण झालेल्या व्यक्तींचा शोध घेतला आहे. ही चारही पथके आपापल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गस्त करून कारवाई करत आहेत.

परिसरातील शाळा, महाविद्यालये, उद्याने, चित्रपटगृहे, बाजारपेठ, गर्दीच्या ठिकाणी भेटी देऊन पोलिस काका व पोलिस दीदीमार्फत टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे बेपत्ता व्यक्ती व अपहरणांच्या गुन्ह्यांचा तपास करत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत विशेषतः महिलांनी पोलिसांशी संपर्क साधून निर्भया पथकाची मदत घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button