पुनावळेतील सेवा रस्त्याला तळ्याचे स्वरूप | पुढारी

पुनावळेतील सेवा रस्त्याला तळ्याचे स्वरूप

ताथवडे; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुनावळे व परिसरातील सेवा रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची येथून ये-जा करताना तारांबळ होत आहे. पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणार्‍या पुनावळे पुलाजवळील सेवा रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. रस्त्याची दुर्दशा एवढी झालेले आहे की येथील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यांना तळ्याचे स्वरूप आलेले आहे.

या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यामुळे तसेच येथील वाहून गेलेल्या डांबरामुळे या रस्त्याचे काम किती निकृष्ट दर्जाचे होते याचा अंदाज येतो. पुनावळे परिसरात अनेक बांधकाम प्रकल्प चालू आहेत. शेजारीच पुणे मुंबई महामार्ग,नामांकित शाळा, कॉलेजेस असल्याने येथे कामगारवर्ग, विद्यार्थी वर्ग, स्थानिक रहिवासी यांची मोठी वर्दळ याठिकाणाहून सुरु असते; परंतु या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथून ये-जा करावी की नाही, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे. येथून वाहने नेताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. महापालिकेने या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देऊन त्वरित या रस्त्याची डागडुजी करून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशी करीत आहेत.

 

Back to top button