आशिया चषकात मागील चुका होणार नाहीत : रोहित शर्मा | पुढारी

आशिया चषकात मागील चुका होणार नाहीत : रोहित शर्मा

मुंबई ; वृत्तसंस्था : आशिया चषकात यावेळी मागच्यासारख्या चुका होणार नाहीत. भारतीय संघ आता नव्या पद्धतीने खेळणार आहे, असे कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले आहे. आशिया चषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 27 ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय संघ 28 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. सध्या विश्रांतीवर असलेल्या रोहितने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. तिथे त्याने आशिया चषकाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

पाकिस्तानसोबतच्या सामन्याबाबत रोहित शर्मा म्हणाला, आम्ही गेल्यावर्षी दुबईत पाकिस्तानविरुद्ध खेळलो. त्या सामन्यात निकाल आमच्या बाजूने लागला नाही. मात्र, यावेळी तसे होणार नाही. यावेळी भारतीय संघ वेगळ्या पद्धतीने क्रिकेट खेळत आहे. वर्षभरात संघात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आशिया चषक स्पर्धेत आम्ही संघ म्हणून कशी कामगिरी करतो, याकडे आमचे लक्ष असेल. पाकिस्तान असो, बांगला देश असो किंवा श्रीलंका, आम्ही फक्त चांगली कामगिरी करण्याकडे लक्ष देणार आहोत.

2021 मध्ये यूएईमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता. त्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा दहा गडी राखून पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

Back to top button