प्रेयसी खून प्रकरण : टॅक्सीचालक विवाहित प्रियकराला मुंबईतून अटक | पुढारी

प्रेयसी खून प्रकरण : टॅक्सीचालक विवाहित प्रियकराला मुंबईतून अटक

मानखुर्द : पुढारी वार्ताहर :  प्रेयसीचा खून करून तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून गोणपाटात भरून उरण येथे खड्ड्यात टाकण्यात आल्याची घटना 19 एप्रिल रोजी घडली. या प्रकरणी विवाहित प्रियकरास उरण पोलिसांनी अटक केली आहे. ही तरुणी मानखुर्दमध्ये राहात होती.ती नागपाड्यातून बेपत्ता झाली होती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानखुर्दच्या साठे नगर मध्ये पूनम चंद्रकांत क्षीरसागर (27) ही तरुणी तिच्या कुटुंबासह राहत होती. नागपाडा, सँडहर्स्ट रोड येथे ती घरकाम करण्यास जात असे. शेयर टॅक्सीने प्रवास करताना टॅक्सी चालक निजामुद्दीन रसिक अली(27) याच्याशी तिची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. गेली चार वर्षे प्रेमसंबंध होते. मूळचा उत्तर प्रदेशच्या लखनऊचा रहिवासी असलेल्या निजामुद्दीनचे लग्न झालेले होते त्याला दोन वर्षाचा मुलगा आहे. निजामुद्दीन मुंबईत भाड्याने टॅक्सी चालवून जेजे रुग्णालयाच्या आजूबाजूला पदपथावर अथवा टॅक्सीतच राहत असे.

18 एप्रिल रोजी पूनम नेहमीप्रमाणे कामाला गेली. मात्र ती रात्री घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविली. या दिवशी निजामुद्दीन याने पूनमला कल्याणजवळील खडवली येथे फिरायला नेले होते. या दरम्यान पूनमला आलेल्या काही फोन वरून निजामुद्दीन याने संताप व्यक्त करीत तिला मारहाण केली आणि तिचा गळा दाबून तिची हत्या केली. 19 रोजी रात्री त्याने तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून गोणपाटात भरून उरणजवळील चिरनेर येथे रस्त्याच्या कडेला दहा बारा फूट खोल खड्ड्यात फेकून दिला.

इकडे मुंबई पोलीस पूनम चा शोध घेत असताना त्यांना तांत्रिक तपासावरून ती निजामुद्दीन याच्याशी त्या दरम्यान वारंवार बोलली असल्याचे समजले होते. त्यावरून पोलिसांनी निजामुद्दिनला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली.त्यावेळी त्याने हत्येची कबुली दिली. याच दरम्यान दि 26 रोजी चिरनेर येथील पोलीस पाटील संजय पाटील हे पहाटे फिरायला गेले असता त्यांना कुजलेला वास आल्याने त्यांनी आणि काही स्थानिकांनी खड्ड्यात उतरून पहिले असता त्यांना तिथे पूनमचा मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती उरण पोलिसांना दिली.

मृतदेह कुजलेला असल्याने ओळख पटत नव्हती. मात्र उरण पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. या वेळी त्यांनी मुंबई पोलिसांना मृतदेहाचे फोटो पाठवले असता ते बेपत्ता पूनमच्या माहितीशी जुळले. त्यानंतर निजामुद्दीन रसिक अली याला उरण पोलिसांकडे सोपवण्यात आले.

निजामुद्दीनला अटक करून उरण पोलिसांनी त्याला उरण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लव जिहादचा आरोप

हे प्रकरण लव्ह जिहाद असल्याचा आरोप हिंदुत्तववादी संघटनांनी केला आहे.याची माहिती मिळताच मुंबई उपनगर चे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सोमवार दि 29 रोजी मानखुर्द येथे जाऊन मयत मुलीच्या कुटुंबाची भेट घेतली. किरीट सोमय्या म्हणाले पूनमचे अपहरण करून फसवणूक करून तिची हत्या करण्यात आली आहे. लव्ह जिहाद चे हे आणखी एक प्रकरण आहे. तर मंगलप्रभात लोढा म्हणाले, अशा घटना वारंवार होत आहेत, सरकारी जमिनीवर रोहिंग्या बांग्लादेशींना वसवले जात आहे. या बाबत पालिका , जिल्हाधिकारी , पोलीस अधिकार्‍यांना कळवले आहे.

Back to top button