Lok sabha election 2024 : रिव्‍हॉल्व्हर, बंदूक, १२ किलो चांदी… जाणून घ्‍या संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची एकूण संपत्ती | पुढारी

Lok sabha election 2024 : रिव्‍हॉल्व्हर, बंदूक, १२ किलो चांदी... जाणून घ्‍या संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची एकूण संपत्ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी ( दि. २९) उत्तर प्रदेश लखनौ मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्‍यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली मालमत्ता स्‍पष्‍ट केली आहे. भाजपने त्यांना सलग तिसऱ्यांदा लखनौमधून उमेदवारी दिली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार राजनाथ सिंह यांच्याकडे ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

७२ वर्षीय राजनाथ सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्‍यांची एकूण संपत्ती कोट्यवधी रुपयांची आहे. संरक्षणमंत्र्यांकडे 75,000 रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे 45,000 रुपयांची रोकड आहे. लखनौ आणि दिल्लीतील वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण 3,11,32,962 रुपये आहेत. त्याचवेळी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात 90,71,074 रुपये आहेत.

लाखांचे दागिने; पण शेअर्सपासून लांबच

निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, राजनाथ सिंह यांनी कोणत्याही शेअर किंवा बाँडमध्ये पैसे गुंतवलेले नाहीत. तसेच त्यांनी कोणत्याही बचत योजनेत कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. त्यांच्या पत्नीने पोस्ट ऑफिस खात्यात 6.51 लाख रुपये गुंतवले आहेत. राजनाथ सिंह यांच्याकडे 60 ग्रॅम सोने आहे, ज्याची किंमत 4.20 लाख रुपये आहे, तर त्यांच्याकडे 4 लाख रुपयांची अनेक मौल्यवान रत्ने आहेत.
राजनाथ सिंह यांच्या पत्नीकडे 750 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत, ज्याची किंमत 52,50,000 रुपये आहे, तर 12.5 किलो चांदी आहे, ज्याची किंमत 9,37,500 रुपये आहे.

रिव्हॉल्व्हर आणि दोन बॅरल बंदूक;पण नावावर कार नाही

राजनाथ सिंह यांच्या संपत्तीत शस्त्रांचाही समावेश आहे. त्याच्याकडे 32 बोअरचे रिव्हॉल्व्हर असून, एक डबल बॅरल बंदूकही त्याच्या नावावर नोंदवण्यात आली आहे. तसेच त्‍यांच्‍या नावावर १.४७ कोटी रुपयांची शेतजमीन आहे, लखनौमध्‍ये त्‍यांच्‍या नावावर एक घर आहे ज्याची किंमत १.८७ लाखांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे कोट्यवधींची संपत्ती असूनही राजनाथ सिंह यांच्या नावावर एकही कार नाही.

Back to top button