Dhule News | स्वीप उपक्रमातंर्गत आयोजित ‘वोट कर धुळेकर’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

Dhule News | स्वीप उपक्रमातंर्गत आयोजित ‘वोट कर धुळेकर’ महारॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

धुळे : पुढारी वृत्तसेवा- येत्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रत्येकाने आपले कुटूंब, शेजारी, नातेवाईक यांना मतदान करण्यास प्रेरीत करुन मतदार दूत म्हणून काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी अवघ्या धुळेकरांना केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून धुळे शहरात आज महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, महानगर पालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था, संघटनामार्फत महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी  गोयल बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तथा स्वीप चे जिल्हा नोडल अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, स्वीपचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय बागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, मनपा अतिरिक्त उपायुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, गणेश मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, उपनिबंधक सहकार मनोज चौधरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, येत्या 20 मे 2024 रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी धुळ्यातील प्रत्येक मतदाराने दूत म्हणून काम करुन लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यास हातभार लावावा. आज धुळे शहरात स्वीपअंतर्गत जिल्हा प्रशासनामार्फत महारॅली काढण्यात आली असून या रॅलीमार्फत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

धुळ्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘वोट कर धुळेकर’ ही संकल्पा राबविण्यात येत असून सर्व धुळेकरांनी मतदान करण्याबरोबरच तुम्ही तुमच्या कुटूंब, कॉलनी, परिसर, नातेवाईक तसेच तुमच्या संपर्कातील सर्व नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे. विद्यार्थ्यांनीही आपल्या पालकांना व नातेवाईकांना मतदानासाठी प्रवृत्त करुन येत्या लोकसभेत सर्वांनी भयमुक्त निपक्षपणे मतदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भारत निवडणूकीच्या आदेशानुसार उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, शेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांना मतदानाच्या वेळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यांची दक्षता प्रशासनामार्फत घेण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी महसूल, जिल्हा परिषद, पोलीस विभाग, महानगर पालिका व इतर विविध विभागांसह अनेक सामाजिक संस्था, संघटनांच्या चार पथकामार्फत रॅली आयोजित करण्यात आली होती. या चारही रॅली शिवतीर्थ, संतोषी माता चौक, धुळे  येथे एकत्रितपणे येऊन संतोषी माता चौक ते गरुड मैदानापर्यंत महारॅली काढण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, मी मतदान करणार, वोट कर धुळेकर, इथे सगळी बोटे सारखी आहेत, आदि घोषणा दिल्या. या महारॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 गरुड मैदान येथे मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी शिक्षक कलापथकाने तसेच महाविद्यालयीन विद्यार्थींनीनी पथनाट्य तर दुर्गेश बोरसे यांनी अहिराणी गीत सादर केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व उपस्थितांना मतदान करण्याबाबत शपथ दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्लेफी पॉईंट वर सेल्फी फोटो घेतला  तसेच ‘मी मतदान करणार’ याबाबत स्वाक्षरी मोहिमेच्या  बोर्डवर स्वाक्षरी केली. कार्यक्‌रमाचे प्रास्ताविक स्वीप नोडल अधिकारी मनपा तथा उपायुक्त संगिता नांदुरकर यांनी तर आभार प्रदर्शन उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी केले. या महारॅलीत ज्येष्ठ नागरिक संघ, माध्यम प्रतिनिधी, दिव्यांग, योगा क्लब, सायकलींग क्लब, लायन्स क्लब, रोटरी क्लब, विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, हौसिंग सोसायटी, जिल्हा व सहकारी बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, माथाडी कामगार, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला.

हेही वाचा –

Back to top button