14th Vice President : जगदीप धनकड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ | पुढारी

14th Vice President : जगदीप धनकड यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा :
देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनकड यांनी गुरुवारी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून त्यांनी ही शपथ घेतली. अलिकडेच पार पडलेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार धनकड यांनी विरोधी गोटाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला होता. धनकड यांना 528 तर अल्वा यांना 182 मते मिळाली होती.

उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्यापूर्वी धनकड यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनात पोहोचले. मावळते उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना गत सोमवारी संसदेत निरोप देण्यात आला होता. नायडू यांचा कार्यकाळ बुधवारी संपला होता. उपराष्ट्रपतीपदावर विराजमान होण्यापूर्वी धनकड हे प. बंगालचे राज्यपाल होते. मूळचे ते राजस्थानमधील झुंझनू जिल्ह्यातले रहिवाशी आहेत. त्यांचे वडील शेतकरी होते तर स्वतः धनकड हे वकील आहेत. धनकड यांनी राजस्थान उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. 80 च्या दशकांत प्रतिष्ठित वकील म्हणून ते परिचित होते. यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. झुंझनू लोकसभा मतदारसंघातून निवडून जात ते खासदार बनले होते. 1990 साली ते चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये संसदीय कार्य मंत्री होते. याशिवाय 1993 ते 1998 या काळात ते आमदार होते.

धनकड यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button