गावोगावची ग्रंथालये झाली दिसेनाशी ! शासनासह वाचकांचीही अनास्था ठरतेय कारणीभूत | पुढारी

गावोगावची ग्रंथालये झाली दिसेनाशी ! शासनासह वाचकांचीही अनास्था ठरतेय कारणीभूत

मोरगाव : पुढारी वृत्तसेवा : गावोगावच्या ग्रंथालय चळवळीचे जनक एस.आर. रंगनाथन यांच्या चळवळीने गावोगावी ग्रंथालये निर्माण झाली. मात्र, सध्या गावोगावी ग्रंथालये नगण्य पहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी तर ग्रंथालयाचा मागमूसही दिसत नसल्याचे चित्र आहे. शासकीय अनुदानाने ग्रंथालयाची निर्मिती झाली होती. मात्र, हे अनुदान तुटपुंजे असल्याने सध्या महागाईच्या दिवसांत ग्रंथालयचालकांना कसरत करावी लागत आहे.

मोबाइलच्या आधुनिकतेने पुस्तके याद्वारे पाहावयास मिळतात, त्यामुळे ग्रंथालयात जाणे वाचक टाळत आहेत. परिणामी गावोगावची ग्रंथालये दिसेनाशी झाली आहेत. ग्रंथालय चळवळीला शासकीय अनुदान भरघोस मिळण्याची गरज आहे. ग्रंथालय चालवणे सध्या महागाईच्या दिवसात परवडत नाही. नवीन पुस्तकांच्या किंमती गगनाला भिडल्याने ग्रंथालय चालकांना ती खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. दोन वर्षांपूर्वी कोविडच्या साथीने माणसा-माणसांतील संपर्क दुरापास्त झाला होता.

यामुळे ग्रंथालयांनासुद्धा घरघर लागली आहे. वाचक संख्या रोडावल्याने वाचनालये ओस पडली. वाचक वर्गणी देण्यास टाळाटाळ करतात. परिणामी ग्रंथालयांचे आर्थिक ताळेबंद कोलमडत आहेत. कर्मचार्‍यांचे पगार तुटपुंजे असल्याने ग्रंथालयात नोकरीस कोणी धजावत नाही, अशी माहिती मोरगाव येथील श्री मयूरेश्वर ग्रंथालय चालकांनी दिली.

Back to top button