हिंगोली : ‘त्या’ व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून | पुढारी

हिंगोली : 'त्या' व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील बरडा शिवारातील नाल्याच्या पाण्यात फेकून दिलेल्या व्यक्तीचा अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी लोहगाव येथील  महिलेसह चौघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पांगरी येथील हरिदास वकटुजी टापरे (वय ५०) या व्यक्तीचा गळा चिरून खून करण्यात आला होता. त्यानंतर मृतदेह सेनगाव तालुक्यातील बरडा शिवारात पुलाच्या खाली पाण्यात टाकण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी खूनाचा छडा लावण्यासाठी परिसरात माहिती घेतली. तर घरातून बाहेर पडताना हरिदास याने लोहगाव येथे जाऊन येतो, असे घराच्यांना सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी लोहगाव परिसरात माहिती घेण्यास सुरवात केली.

या प्रकरणात हरिदास याचे लोहगाव येथे अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याचा अनैतिक संबंधातूनच खून झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अरविंद टापरे यांनी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी व्यंकटी गोविंदा मस्के, ज्ञानेश्‍वर बबन गिऱ्हे, संतोष नामदेव पानबुडे यांच्यासह एका महिलेवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी संशयित आरोपींच्या शोधात पथकेही पाठविली आहेत. उपअधीक्षक वाखारे तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार अनिल भारती, सुदर्शन खांडेकर, वंजारे तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button