कोळसा खाण घोटाळाप्रकरणी एच. सी. गुप्‍ता यांना ३, तर क्रोपा यांना २ वर्षांचा कारावास | पुढारी

कोळसा खाण घोटाळाप्रकरणी एच. सी. गुप्‍ता यांना ३, तर क्रोपा यांना २ वर्षांचा कारावास

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा: महाराष्ट्रातील लोहारा ईस्ट कोळसा खाण घोटाळा प्रकरणात आरोप सिध्द झालेले कोळसा खात्याचे तत्कालीन सचिव एच. सी. गुप्‍ता यांना विशेष न्यायालयाने तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय तत्कालीन संयुक्‍त सचिव के. एस. क्रोपा यांना दोन वर्षांची तर ज्या कंपनीला खाण वाटप करण्यात आले होते, त्या ग्रेस इंडस्ट्रीज नावाच्या कंपनीचे संचालक मुकेश गुप्‍ता यांना चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कोळसा खाण घोटाळ्यातील अनेक प्रकरणांत एच. सी. गुप्‍ता आणि के. एस. क्रोपा हे आरोपी आहेत. या सर्व प्रकरणांची विशेष सीबीआय न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे. लोहारा ईस्ट कोळसा खाण वाटप प्रकरणात गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक तसेच भ्रष्टाचार केल्याचे गुप्‍ता, क्रोपा आणि मुकेश गुप्‍ता यांच्यावरील आरोप 29 जुलैरोजी झालेल्या सुनावणीवेळी सिध्द झाले होते. त्यानुसार न्यायमूर्ती अरुण भारद्वाज यांनी सोमवारी (दि.8) गुन्हेगारांना शिक्षा जाहीर केली.

2005 ते 2011 या कालावधीत गुप्‍ता व क्रोपा यांनी गुन्हेगारी कट रचून तसेच चुकीची माहिती देऊन लोहारा ईस्ट कोळसा खाण ग्रेस इंडस्ट्रीजला दिली होती. ग्रेस कंपनीचे नेटवर्थ 120 कोटी रुपये इतके सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात या कंपनीचे नेटवर्थ अवघे तीन कोटी रुपयांचे होते. शिवाय कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता 30 हजार टन प्रतिवर्ष इतकी असताना ती वाढवून तब्बल 1 लाख 20 हजार टन इतकी सांगण्यात आली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button