पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तातंराचे वारे वाहू लागले आहे. संयुक्त जनता दलाचे नेते (जेडीयू) आणि मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. यावेळेस कारण आहे जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह यांच्या राजीनाम्याचे. भाजप आणि जेडीयूमधील वाद एवढा तीव्र झाला आहे की, एक ते दोन दिवसांमध्ये नितीशकुमार भाजपबरोबरील युती संपुष्टात आल्याची घोषणा करतील, अशी चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेवूया, काय आहे बिहारमधील राजकीय समीकरण?, राज्यातील राजकीय संख्याबळाचा 'गणित'…
बिहारमधील सत्ताधारी जेडीयू आणि भाजपमधील मतभेद हे मागील काही महिन्यांपासून वाढले आहेत. सर्वप्रथम जातनिहाय जनगणनाच्या मुद्यावर नीतीश कुमार आणि भाजपमधील मतभेद समोर आले. या मुद्यावर नितीश कुमार एकटे पडले. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षांना हाताशी धरुन जातनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी केली. यानंतर दोन्ही पक्षांमधील वाद अधिकच चिघळला.
राज्यातील राजकीय विश्लेषकांच्या मते, सरकार चालविताना मोकळीक न मिळणे, राम विलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र चिराग पासवान यांना डावलणे आणि आता भ्रष्टाचाराचा आरोप असेलेले मंत्री आरसीपी सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावे लागणे या मुद्यांमुळे नितीशकुमार हे भाजपवर नाराज आहेत. मात्र प्रमुख कारण हे आरसीपी सिंह यांच्या राजीनामा असल्याचे स्पष्ट होत आहे नुकतेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यालाही जाणे नितीशकुमारांनी टाळले. . यापूर्वी केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी बोलवलेल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली होती. तसेच निती आयोगाच्या बैठकीपासूनही ते अलिप्त राहिले होते. तेव्हापासून त्यांचे भाजपबरोबर बिनसल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बिहार विधानसभा एकुण आमदारांची संख्या २४३ आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी १२२ आमदारांची गरज आहे. सध्या बिहारमधील सर्वात मोठा पक्ष हा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आहे. या पक्षाचे विधानसभेत ७९ आमदार आहेत. भाजप, जेडीयू आणि काँग्रेसकडे अनुक्रमे ७७, ४५ आणि १९ आमदार आहेत. कम्युनिस्ट पार्टीचे १२, हिंदुस्तानी आमाव मोर्चाचे चार, एआयएमआयएमचे १ आणि उर्वरीत अपक्ष आमदार आहेत.
सध्या जेडीयूकडे ४५ आमदार आहेत. जेडीयूला सत्तेत कायम राहण्यासाठी ७७ आमदारांची गरज आहे. मागील काही दिवस आरजेडी आणि जेडीयूमधील जवळीक वाढल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर विधानसभेत या आघाडीचे एकुण १२४ सदस्य होतात. हा आकडा बहुमतापेक्षाही जास्त आहे. या आघाडीत काँग्रेस आणि कम्यूनिस्ट पक्षही सहभागी होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास या आघाडीकडे १५५ आमदारांचे बहुमत असेल. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा या पक्षाचे चार आमदारही या नव्या आघाडीत सहभागी होतील, अशी अटकळ व्यक्त होत आहे. एकुणच बिहारमधील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या असून सत्तातंराच्या हालचालींनी वेग घेतल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :