SL vs PAK Test : पाकचा श्रीलंकेवर संस्मरणीय विजय! शतकवीर अब्दुल्ला शफीकने रचला इतिहास | पुढारी

SL vs PAK Test : पाकचा श्रीलंकेवर संस्मरणीय विजय! शतकवीर अब्दुल्ला शफीकने रचला इतिहास

पुढारी ऑनलाईन डेस्क : SL vs PAK Test : अब्दुल्ला शफीकच्या शानदार शतकाच्या जोरावर पाकिस्तानने गॅले कसोटीत श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव केला. यजमान श्रीलंकेने पाहुण्या पाक संघाला 342 धावांचे मोठे लक्ष्य दिले होते, जे बाबर आझमच्या संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. पाकिस्तानच्या विजयाचा हिरो अब्दुल्ला शफीक ठरला. त्याने 408 चेंडूत 160 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. बाबर आझमने 55 आणि मोहम्मद रिझवानने 40 धावा केल्या. पाकिस्तान विजयापासून 19 धावा दूर असताना श्रीलंकेच्या कसून रजिथाने अब्दुल्ला शफीकचा एक सोपा झेल सोडला आणि त्यानंतरच श्रीलंकेच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. या विजयासह पाकिस्तानने कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (SL vs PAK Test : Pakistan chased down a record target of 342 in Galle and beat Sri Lanka)

पाकिस्तानने रचला इतिहास

श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तानचा विजय ऐतिहासिक आहे. कारण गॅले येथे चौथ्या डावात प्रथमच 300 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठले गेले आहे. तर, कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या दीड महिन्यात पाच वेळा 250 हून अधिक धावांचे टार्गेट पूर्ण करून सामने जिंकले आहेत.

अब्दुल्ला शफीकच्या शतकाच्या जोरावर पाकिस्तानने कसोटी क्रिकेटमधील दुसरे सर्वात मोठे लक्ष्य गाठले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या डावात पाकिस्तानी संघाने अवघ्या 85 धावांत 7 विकेट गमावल्या होत्या. पण बाबर आझमने शतक झळकावून पाकिस्तानला श्रीलंकेच्या धावसंख्येच्या जवळ आणले. यानंतर अब्दुल्ला शफीक दुसऱ्या डावात स्टार झाला आणि पाकिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. (SL vs PAK Test : Pakistan beat Sri Lanka)

सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेच्या संघाने 222 धावा केल्या. याला प्रत्युत्तरात पाक संघाची श्रीलंकन गोलंदाजांसमोर भांबेरी उडाली. त्यांचा संघ 150 पेक्षा कमी धावसंख्येवर सर्वबाद झाला असता पण शेवटच्या विकेटसाठी कर्णधार बाबर आझम आणि नसीम शाह यांनी चांगली भागीदारी रचून आश्वासक 218 धावसंख्येपर्यंत मजल मारली. बाबर आझमने शतक झळकावले. अशाप्रकारे श्रीलंकेच्या संघाला केवळ 4 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने दुसऱ्या डावात सर्व विकेट्स गमावून 337 धावा केल्या आणि त्यामुळे पाक संघाला 342 धावांचे लक्ष्य मिळाले. श्रीलंकेच्या फिरकीपटूंसमोर हे लक्ष्य गाठणे पाकसाठी सोपे नव्हते, पण अब्दुल्ला शफीकचे झुंजार शतक (160 धावा) आणि बाबरने झळकावलेल्या अर्धशतकाच्या (104 चेंडूत 55 धावा) जोरावर पाकने विजय मिळवला. श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याला दुसऱ्या डावात चार विकेट घेण्यात यश आले. तर रमेश मेंडीस आणि धनंजय डीसिल्वा यांना 1-1 विकेट मिळाली. (SL vs PAK Test : Pakistan beat Sri Lanka)

गावस्कर आणि बाबर आझमच्या खास क्लबमध्ये शफीक सामील…

शफिक आपल्या शतकी खेळीदरम्यान 524 मिनिटे क्रीजवर उभा राहिला. तसेच त्याने 400 हून अधिक चेंडूंचा सामना केला. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात 400 किंवा त्याहून अधिक चेंडूंचा सामना करणाऱ्या इंग्लंडच्या माइक अथर्टन आणि हर्बर्ट, भारताचा सुनील गावस्कर आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांच्या क्लबमध्ये शफिक आता सामील झाला आहे. 22 वर्षीय शफीक आपल्या कारकिर्दीतील केवळ सहावा कसोटी सामना खेळला आहे. क्रिझवर धावांचा पाठलाग करताना 500 मिनिटांपेक्षा जास्त वेळ यशस्वीपणे खेळणारा तो आता कसोटी क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. शफीक अब्दुल्लाला त्याच्या उत्कृष्ट शतकी खेळीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

दरम्यान, पाकिस्तानच्या या विजयाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट टेबलमध्ये बदल झाला आहे. पहिला सामना सुरू होण्यापूर्वी चौथ्या क्रमांकावर असलेला पाकिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे, तर पाकच्या विजयाचा भारतालाही फायदा होऊन टीम इंडिया गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे.

Back to top button