छत्तीसगड चकमकीत गडचिरोलीतील चार नक्षल कमांडर ठार | पुढारी

छत्तीसगड चकमकीत गडचिरोलीतील चार नक्षल कमांडर ठार

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपूर्वी ३० एप्रिलला छत्तीसगडमधील नारायपूर जिल्ह्यातील अबुझमाड जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत १० नक्षलवादी ठार झाले. यात गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत वरिष्ठ नक्षल नेता जोगन्ना आणि पत्नी संगीता आत्राम यांच्यासह कंपनी क्रमांक १० चा कमांडर मल्लेश आणि सहकमांडकर विनय यांचाही समावेश आहे.

नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाड परिसरातील टेकामेटा गावाजवळच्या जंगलात अबुझमाड डिव्हीजन आणि उत्तर गडचिरोली डिव्हीजनच्या वरिष्ठ नक्षलवाद्यांचे शिबिर सुरु असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छत्तीसगड पोलिस घटनास्थळी पोहचताच ३० एप्रिलला पहाटे पोलिस आणि नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. ही चकमक तब्बल १६ तास चालली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता ७ पुरुष आणि ३ महिला नक्षल्यांचे मृतदेह आढळून आले. शिवाय १ एके-४७, १ इंसास, दोन ३०३ रायफल, एक ३१५ रायफल, एक १२ बोर बंदूक, चार भरमार बंदुका, स्फोटके, पुस्तके, संगणक आणि अन्य साहित्यही आढळून आले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले.

मृत नक्षल्यांमध्ये एक स्पेशल झोनल कमिटी मेंबर, एक डीव्हीसीएम आणि एक एसीएमचा समावेश आहे. यासंदर्भात गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले की, यातील स्पेशल झोनल कमिटी मेंबर जोगन्नावर १९६ गुन्हे दाखल आहेत. मुळचा तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यातील जय्याराम येथील रहिवासी असलेला जोगन्ना हा नक्षल दलममधील वरिष्ठ नक्षल होता. ६६ वर्षीय जोगन्नाने त्याची बरीच कारकिर्द गडचिरोली जिल्ह्यात घालवली आहे. महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

कमांडर मल्लेशवर ४३ गुन्ह्यांची नोंद आहे. ४१ वर्षीय मल्लेश हा छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्यातील रहिवासी होता. नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक १० चा तो कमांडर आणि विभागीय समिती सदस्य होता. त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तो गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होता. ५५ वर्षीय विनय उर्फ रवी हा तेलंगणा राज्यातील चेन्नूर तालुक्यातील रहिवासी होता. तोसुद्धा विभागीय समिती सदस्य होता. विनयवर ८ गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावरही महाराष्ट्र सरकारने ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

जोगन्नाची पत्नी संगीता दोगे आत्राम ही अहेरी तालुक्यातील रामय्यापेठा येथील रहिवासी होती. कसनसूर दलम आणि अन्य दलममध्ये तिने काम केले होते. डॉक्टर आणि प्रेस टीम लीडर म्हणून ती कार्यरत होती. सहायक कमांडर असलेल्या संगीतावर ५ लाख रुपयांचे बक्षीस होते.

प्रचंड दहशत आणि लोकप्रियही होता जोगन्ना

ठार झालेल्या जोगन्नाने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीत ३५ वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. जोगन्नाची प्रचंड दहशत होती. ३० मे २०१० रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या तत्कालिन सभापती प्रीती गोडशेलवार यांचे पती श्रीनिवास गोडशेलवार यांच्यासह पोलिस भरतीसाठी गेलेला मनोज कांदो आणि अन्य दोघांचे नक्षल्यांनी अपहरण केले होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन अपहरण केलेल्याची सुटका केली होती. हे अपहरण जोगन्नाच्या नेतृत्वात झाले होते.

अनेक भूसुरुंग स्फोट आणि चकमकींमध्ये जोगन्नाचा सहभाग होता. बरचदा तो दक्षिण भागातील गावांमध्ये धोतर आणि बंडी घालून सामान्य व्यक्तीप्रमाणे वावरत होता. त्यामुळे अेकवेळा पोलिस त्याला ओळखू शकले नाहीत. दोन वर्षांपूर्वी कर्करोगाच्या आजाराने निधन झालेली वरिष्ठ नक्षली नर्मदाक्का हिच्याप्रमाणेच जोगन्नासुद्धा आदिवासी युवकांना पुस्तके खरेदी, इतर शैक्षणिक बाबी आणि नोकरीसाठी आर्थिक मदत करायचा. त्यामुळे युवकांमध्ये तो लोकप्रिय होता, अशी चर्चा नेहमीच होत होती.

Back to top button