विक्रम! द. आफ्रिकेच्या संघाने एकही षटकार न मारता इंग्लंडविरुद्ध रचला धावांचा डोंगर

विक्रम! द. आफ्रिकेच्या संघाने एकही षटकार न मारता इंग्लंडविरुद्ध रचला धावांचा डोंगर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात मंगळवारी डरहम येथे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात पाहुण्या द. आफ्रिकेने शानदार कामगिरी केली. पहिल्यांदा फलंदाजी करताना द. आफ्रिकेने इंग्लंडविरुद्ध मोठी धावसंख्या उभारत एक ऐतिहासिक खेळीची नोंद केली. यजमान संघासमोर 333 धावांचा डोंगर उभारताना एकाही आफ्रिकन खेळाडूने षटकार खेचला नाही. वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात षटकाराशिवाय 330 धावांचा टप्पा पार करणारी ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.

वास्तविक, बेन स्टोक्सच्या (ben stokes) शेवटच्या एकदिवसीय सामन्यात द. आफ्रिकेच्या संघाने एकही षटकार न मारता 333 धावा केल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही तिसरी वेळ होती, जेव्हा एखाद्या संघाने 330 पेक्षा जास्त धावा केल्या आणि एकही षटकार मारला नाही. द. आफ्रिकेने एकही षटकार न मारता एकदिवसीय क्रिकेटमध्ये संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. 2011 मध्ये सिडनी येथे इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 बाद 333 धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेने 2020 मध्ये हंबनटोटा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 8 बाद 345 धावा केल्या. (ENG vs SA)

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही षटकार न मारता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेने 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 8 विकेट गमावून 345 धावा केल्या. त्याचवेळी, आता दक्षिण आफ्रिकेने 5 गड्यांच्या मोबदल्यात 333 धावा केल्या आहेत. इंग्लंड संघाने 2011 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6 विकेट गमावून इतक्याच धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्याबद्दल बोलायचे झाले तर इंग्लिश संघाने 3 षटकार ठोकले. या सामन्यात इंग्लिश संघाचा 62 धावांनी पराभव झाला. याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेतील पाहुण्या द. आफ्रिका संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. (ENG vs SA)

द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकन संघाने 50 षटकांत 5 बाद 333 धावा केल्या. रुसी व्हॅन डर ड्युसेनने शानदार शतक झळकावले. त्याने 117 चेंडूत 133 धावा केल्या. ड्युसेनने आपल्या खेळीत 10 चौकार मारले. तर एडन मार्करामने 61 चेंडूत 77 धावा केल्या. त्याने नऊ चौकार मारले. मालनने 77 चेंडूत 57 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकात 14 चेंडूत नाबाद 24 धावा फटकावल्या. क्विंटन डी कॉकने 19 आणि हेनरिक क्लासेनने 12 धावा केल्या. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक दोन बळी घेतले. सॅम करन, मोईन अली आणि ब्रेडन कार्स यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

इंग्लंडच्या डावाबद्दल बोलायचे झाले तर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 102 धावांची भागीदारी केली. रॉय 62 चेंडूत 43 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बेअरस्टोने 71 चेंडूत 63 धावा केल्या. तर जो रूटने 77 चेंडूत 86 धावा केल्या, पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्याला दुसऱ्या टोकाकडूनही साथ मिळाली नाही आणि संघाला पराभव पत्कारावा लागला. शेवटचा सामना खेळणाऱ्या बेन स्टोक्सने पाच धावा केल्या. कर्णधार जोस बटलर 12, लियाम लिव्हिंगस्टोन 10 आणि मोईन अली तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. खालच्या क्रमवारीत सॅम कुरनने 18, ब्रेडन कार्सने 14 आणि मॅटी पॉट्सने नाबाद तीन धावा केल्या. आदिल रशीदला खातेही उघडता आले नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 46.5 षटकांत 271 धावांत गारद झाला. या मालिकेतील दुसरा सामना 22 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणार आहे.

वनडे क्रिकेटचा निरोप घेतना स्टोक्सला अश्रू अनावर…

इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने (ben stokes) एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मंगळवारी (19 जुलै) त्याने द. आफ्रिकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. डरहम हे स्टोक्सचे होम ग्राऊंड आहे. पण तो आपल्या प्रेक्षकांसमोर चमकदार कामगिरी करण्यात अपयशी ठरला आणि पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तसेच गोलंदाजी करतानाही तो प्रभावी ठरला नाही आणि त्याला एकाही फलंदाजाला बाद करता आले नाही. स्टोक्सने पाच षटकांत 44 धावा दिल्या. मैदान सोडताना स्टोक्सला अश्रू अनावर झाले होते. तो भावनिक होऊन प्रेक्षकांना डबडबलेल्या डोळ्यांनी वनडे क्रिकेटचा निरोप घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news