Hardik Pandya 3rd ODI : हार्दिक पंड्याची गांगुली-युवराज पेक्षाही सरस कामगिरी, नव्‍या विक्रमाला गवसणी | पुढारी

Hardik Pandya 3rd ODI : हार्दिक पंड्याची गांगुली-युवराज पेक्षाही सरस कामगिरी, नव्‍या विक्रमाला गवसणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इंग्‍लंड विरुद्‍धच्‍या तिसर्‍या आणि निर्णायक सामन्‍यात विजय मिळवत टीम इंडियाने मालिका जिंकली आहे. हा विजय ऋषभ पंत (यष्टीरक्षक) यांच्‍या दमदार शतक आणि हार्दिक पंड्याच्‍या (Hardik Pandya 3rd ODI) अष्‍टपैलू कामगिरीमुळे स्‍मरणीय ठरला. या सामन्‍यात हार्दिकच्‍या नावावर नव्‍या विक्रमाची नोंद झाली असून, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांना जमली नाही, अशा विक्रमाची नोंद त्‍यांच्‍या नावावर झाली आहे.

आशिया खंडाबाहेर दमदार खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू

रविवारच्‍या सामन्‍यात हार्दिकने ५५ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. हार्दिक आणि ऋषभ यांच्‍या भागीदारीमुळे भारताचा विजय सुकर झाला.या सामन्‍यातील दमदार खेळीमुळे हार्दिकच्‍या नावावर काही नवीन नोंदले गेले आहेत. वन डे सामन्‍यात चार बळी आणि ५० पेक्षा अधिक धावा करणारा तो भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. अन्‍य चार खेळाडूंनी आशिया खंडातच अशी कामगिरी केली आहे. मात्र आशिया खंडाबाहेर अशी दमदार कामगिरी करणारा हार्दिक हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

Hardik Pandya 3rd ODI : दिग्‍गजांच्‍या यादीत हार्दिकच्‍या नावाचा समावेश

वन डे सामन्‍यात चार बळी आणि ५० पेक्षा अधिक धावा करणारा हार्दिक भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी के. श्रीकांत, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांनी केली होती. के. श्रीकांत यांनी १९८८ मध्‍ये विशाखापट्टनम येथे न्‍यूझीलंड विरुद्‍धच्‍या वन डे सामन्‍यात २७ धावा देत पाच बळी घेतले होते. तर ७० धावाही केल्‍या होत्‍या. सचिन तेंडुलकर याने १९९८मध्‍ये ढाका येथे १४१ धावांची खेळी केली होती. तर ३८ धावांमध्‍ये ४ बळीही घेतले होते.

सौरव आणि युवराज यांच्‍या खेळीची आठवण

१९९९ मध्‍ये सौरव गांगुली याने नागपूरमध्‍ये श्रीलंकेविरुद्‍ध नाबाद १३० धावा फटकावत २१ धावांमध्‍ये ४ विकेट घेतल्‍या
होत्‍या. तसेच २००० मध्‍ये त्‍याने कानपूरमध्‍ये झिंब्‍बाबेविरोधातील सामन्‍यात ७१ धावा केल्‍या. आणि ३४ धावांमध्‍ये ५ बळी घेतले होते.
युवराज सिंह याने २००८ मध्‍ये इंदौर येथे इंग्‍लंडविरुद्‍ध ११८ धावा केल्‍या तर २८ धावा देत ४ बळी घेतले होते. तसेच त्‍याने २०११ मध्‍ये बंगळूरमध्‍ये आर्यलंडविरोधात ३१ धावांमध्‍ये ५ बळी घेतले होते. नाबाद ५० धावाही केल्‍या होत्‍या.

इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या तिन्‍ही फार्मेटमध्‍ये हार्दिकची धडाकेबाज खेळी

विशेष म्‍हणजे, इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या तिन्‍ही फॉर्मेटमध्‍ये हार्दिकने चारपेक्षा अधिक बळी आणि ५० पेक्षा अधिक धावा केल्‍या आहेत. २०१८ मध्‍ये त्‍याने नॉटिंघम कसोटी सामन्‍यातील पहिल्‍या डावात नाबाद ५२ धावा करत त्‍याने २८ धावा देत पाच बळी घेतले होते. नुकत्‍याचा इंग्‍लंडविरुद्‍धच्‍या टी-२० मालिकेतील सामन्‍यात त्‍याने ५१ धावा केल्‍या तसेच ३३ धावांमध्‍ये चार विकेट घेतल्‍या होत्‍या. यानंतर रविवारी झालेल्‍या वन डे सामन्‍यात त्‍याने चार बळी घेत ५५ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आणि जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी पाकिस्‍तानच्‍या मोहम्‍मद हफीज याने अशी कामगिरी केली आहे.

Back to top button