Rishabh Pant : ४, ४, ४, ४, ४…ऋषभ पंतनं डेव्हिड विलीची काढून टाकली हवा, ५ चेंडूत ५ चौकार (पहा व्हिडिओ) | पुढारी

Rishabh Pant : ४, ४, ४, ४, ४...ऋषभ पंतनं डेव्हिड विलीची काढून टाकली हवा, ५ चेंडूत ५ चौकार (पहा व्हिडिओ)

मँचेस्टर; पुढारी ऑनलाईन : भारताने (IND vs ENG 3rd ODI) तिसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडचा ५ विकेटस्नी पराभव करीत मालिकेत २-१ असा विजय मिळवला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचे (Rishabh Pant) (१२५) शतक आणि हार्दिक पंड्याची अष्टपैलू कामगिरी (७१ धावा, ४ विकेटस्) या दोघांच्या अफलातून कामगिरीमुळे भारताने इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकली. ७२ धावांवर चौथी विकेट गेल्यानंतर असे वाटू लागले होते की टीम इंडिया मालिका गमावेल. पण ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या १३३ धावांच्या भागीदारीने भारताला विजयाजवळ नेले. ४२ व्या ओवरमध्ये पंतने तुफानी खेळी केली. पंतने डेव्हिड विली (David Willey) याच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली. विलीच्या पहिल्या पाच चेंडूवर पंतने सलग ५ चौकार ठोकले आणि शेवटच्या चेंडूवर त्याने एक धाव घेऊन एका ओवरमध्ये २१ धावा कुटल्या.

पहिला चेंडू : डेव्हिड विलीचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि पंतने तो मिड- ऑफच्या वरुन मारत चौकार ठोकला.

दुसरा चेंडू : पंतने चेंडू स्क्वेअर लेगच्या सीमारेषेच्या बाहेर मारत चौकार ठोकला.

तिसरा चेंडू : विलीने चेंडू पुढे टाकला. पंतने तो एक्स्ट्रा कव्हरमध्ये चौकारासाठी ढकलत चौकाराची हॅट्ट्रिक केली.

चौथा चेंडू : पुन्हा एकदा विलीने शॉर्ट बॉल टाकला. पंतने ऑफ स्टंपच्या बाहेर येत लाइन लेगच्या दिशेने चौकार मारला.

पाचवा चेंडू : हा चेंडू पुढे होता आणि पण त्याने विकेटसमोर दमदार शॉट खेळून चार धावा काढल्या.

सहावा चेंडू : विलीने ओवरमधील शेवटचा चेंडू स्लो टाकला. पण पंतने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळत एक धाव घेतली.

कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतके करणाऱ्या ऋषभ पंतचे (Rishabh Pant) वनडे तील ही पहिले शतक आहे. ११३ चेंडूच्या खेळीत १६ चौकार आणि २ षटकार ठोकले. त्याने ज्यो रूटच्या चेंडूवर ४३ व्या षटकांत रिव्हर्स स्वीप मारून भारताला विजय मिळवून दिला
मँचेस्टरच्या मैदानावर खेळलेल्या तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पंड्या, मोहम्मद सिराज, यजुवेंद्र चहल यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर भारताने इंग्लंडला ४५.५ षटकांत २५९ धावांत रोखले. हार्दिकने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविताना २४ धावांत ४ विकेटस् घेतल्या. इंग्लंडकडून बटलरने सर्वाधिक ६० धावा केल्या. त्यानंतर भारताची आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी शतकी भागीदारी करीत भारताचा विजय निश्चित केला.

इंग्लंडच्या २६० धावांचे आव्हान पेलताना भारताची सुरुवात खराब झाली. लॉर्डस् वनडे सामन्यात २४ धावांत ६ विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करणार्‍या रिसे टॉप्लीने तिसर्‍या सामन्यातही धक्कातंत्र कायम राखत भारताचे आघाडीचे तीन फलंदाज टोपलीत घातले. त्याने पहिल्या तीन षटकांत भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन व रोहित शर्मा यांच्यासह विराट कोहली यांना स्वस्तात माघारी पाठवून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. शिखर धवन एक धाव काढून बाद झाला. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला केवळ १७ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने १६ धावा केल्या. ७२ धावांवर भारताची चौथी विकेट पडली होती.

भारताची भरकटणारी ही नाव हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंत यांनी सावरली. एरव्ही तोडफोड फलंदाजी करणार्‍या ऋषभ पंतने संयमी फलंदाजी केली. त्याने अर्धशतक झळकावण्यासाठी ७१ चेंडू घेतले. हार्दिक पंड्याने मात्र ४३ चेडूंत अर्धशतक साजरे केले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ९९ चेंडूंत शतकी भागीदारी केली. हार्दिक पंड्या ५५ चेंडूंत ७१ धावा काढून बाद झाला. हार्दिकने आपल्या खेळीत १० चौकार मारले. त्याने ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी ११५ चेंडूंत १३३ धावांची भागीदारी केली आणि भारताला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. हार्दिक बाद झाला तेव्हा भारताचा विजय सुनिश्चित झाला. भारताला यावेळी १४ षटकांत ५४ धावांची आवश्यकता होती. त्यानंतर ऋषभ पंतने आपला गियर बदलला आणि १०६ चेंडूंत शतक पूर्ण केले.

(IND vs ENG 3rd ODI) ऋषभने रवींद्र जडेजाच्या मदतीने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. भारताचा ४२.१ षटकांत विजय पूर्ण झाला. ऋषभ ११३ चेडूंत १२५ धावा करून नाबाद राहिला. जडेजाने नाबाद ७ धावा केल्या. तत्पूर्वी, रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मह सिराजने जॉनी बेअरस्टो (०) व ज्यो रूट (०) यांना चार चेंडूंत माघारी पाठवले. जेसन रॉय व बेन स्टोक्स यांनी तिसर्‍या विकेटसाठी ४७ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा हार्दिक पंड्याने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. जेसन रॉय ४१ धावांवर तर स्टोक्स २७ धावांवर माघारी परतला.

मोईन अली व कर्णधार जोस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला होता. त्यांनी ८५ चेंडूंत ७४ धावा झोडल्या. जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मोईन अली (३४) बाद झाला. पंतने भन्नाट कॅच घेतला. बटलरने दुसर्‍या बाजूने संघर्ष सुरू ठेवताना अर्धशतक पूर्ण केले.

Back to top button