बुलडाणा : शेतकऱ्यांची ३ कोटींची फसवणूक करणारा व्यापारी गजाआड | पुढारी

बुलडाणा : शेतकऱ्यांची ३ कोटींची फसवणूक करणारा व्यापारी गजाआड

बुलडाणा, पुढारी वृत्तसेवा : चिखली तालुक्यातील शेकडो शेतक-यांकडून कित्येक कोटी रूपयांचे सोयाबीन व अन्य शेतमालाची खरेदी केल्यानंतर पैसे देण्याचे टाळून फरार झालेला संशयित आरोपी संतोष रणमोडे याला आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने गजाआड केले आहे. संशयित आरोपी रणमोडे याने शेतमालाचे पैसे बुडवून ३ कोटी ४२ लाख ४१ हजार ५०० रूपयांची फसवणूक केल्याच्या एकूण २८१ शेतकऱ्यांच्या तक्रारी अंढेरा व चिखली पोलीस ठाण्यात मागील महिन्यात दाखल झाल्या आहेत. आरोपीकडून पोलीसांनी ४१ लाखांची रक्कम हस्तगत केली आहे.

संशयित आरोपी संतोष रणमोडेने शेतक-यांना खोटे चेक्स देऊन फसवले आहे. हा सुरूवातीला दिवाणी स्वरूपाचा गुन्हा वाटत असल्याने पोलीसांनी फौजदारी कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती. परंतु, फसवणूकीच्या गुन्ह्याची व्याप्ती पाहता फरार झालेल्या व्यापा-यावर तात्काळ फौजदारी कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनावर दबाव टाकला. यानंतर अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला.

काय आहे प्रकरण?

व्यापारी संतोष रणमोडे याने काही वर्षापासून चिखली तालूक्यातील शेतक-यांकडून उधारीवर शेतमाल खरेदी करून व सुरूवातीला मालाचे पेमेंट वेळेवर करून विश्वास संपादन केला. खेडा खरेदीच्या माध्यमातून म्हणजेच, खेड्यात जाऊन शेतक-यांच्या दारात केलेली शेतमाल खरेदी व बाजारभावापेक्षा जागेवरच थोडा अधिक भाव देत असल्याने शेतकरीही त्याला उधारीवर व मोठ्या प्रमाणात शेतमाल देऊ (विकू) लागले होते.

कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील लोंढा नाला प्रकल्प ओव्हरफ्लो

काही शेतक-यांकडून मौखिक विश्वासाने तर काही शेतक-यांना पुढील तारखांचे चेक देऊन व्यापारी संतोष रणमोडे याने गेल्या हंगामात सोयाबीन व अन्य शेतमालाची काही करोडो रूपयांची शेतमालाची खरेदी उधारीवर केली होती. काही काळाने शेतक-यांनी शेतमालाच्या पैशाचे मागणीसाठी त्याचेकडे तगादा लावल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला. काही शेतक-यांनी चेक बॅंकेत दिले असता ते वटले नाहीत. दरम्यान हा व्यापारी संतोष हा ‘नॉट रिचेबल’ झाला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शेतक-यांना समजले.

यानंतर फसवणूक झालेला एक-एक शेतकरी तक्रारी घेऊन पोलिस ठाण्यात दाखल झाले. अंढेरा पोलीस ठाण्यात १२० आणि चिखली पोलीस ठाण्यात १६१ शेतक-यांनी तक्रारी दाखल केल्या. एकूण २८१ तक्रारीमधून ३ कोटी ४२ लाख ४१ हजार ५०० रूपयांची फसवणूक झाल्याचा आकडा समोर आला. या प्रकारणातील अजून काही शेतकरी अद्याप तक्रार करायला पुढे आलेले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फसवणूकीच्या रक्कमेचा आकडा कितीतरी मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तपासात काय काय समोर येते? याकडे शेतक-यांचे लक्ष वेधले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button