हे हिंदुत्वद्रोही सरकार, संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका | पुढारी

हे हिंदुत्वद्रोही सरकार, संजय राऊत यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यासह एकूण पाच निर्णय घेतले होते. हे निर्णय जरी उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घेतले असले तरी ही भाजपची अनेक वर्षापासून मोर्चे काढून नामांतर करण्याची मागणी होती. आता जर हे निर्णय मागे घेतले असतील, तर हे हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही आहेत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली.

या निर्णयाला स्थगिती देणारे शिंदे आणि फडणवीस हे ढोंगी सरकार आहे. मुळात हे सरकार बेकायदेशीर असल्याने यांना निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. खरे तर हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला पाहिजे. कारण तेच खरे मुख्यमंत्री आहेत असा टोलाही त्यांनी हाणला.

लोकांच्या भावना होत्या म्हणून उद्धव ठाकरे सरकारने निर्णय घेतले होते. आर्थिक निर्णय समजू शकतो. बुलेट ट्रेन विषयी निर्णय समजू शकतो, पण औरंगाबादचे संभाजी नगर नामांतराचा निर्णय मागे घेतला. औरंगजेब केव्हापासून नातेवाईक झाला असा प्रश्न उपस्थित केला. न्यायालयाची टांगती तलवार सरकारवर असल्याने डोकं बधिर झाले आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या सगळ्या निर्णयांना स्थगिती देत आहेत, असे ते म्हणाले. शरद पवार सध्या विदर्भात दौर्‍यावर असताना नक्कीच पवार यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न असेल. वेळ जुळली तर भेटू. ठरवुन एकाच हॉटेलमध्ये आम्ही थांबलो असे म्हणू शकता.

मी शिवसेनेचा मालक नाही…

मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली असेल असे म्हणायला मी काय मालक आहे. मी निष्ठावान शिवसैनिक आहे. कोणी आरोप करत असेल तर व्याख्या बदलाव्या लागतील. केंद्रात नवीन डिक्शनरी आणली. भ्रष्‍ट, ढोंगी, गद्दार हे शब्द वापरायचे नाहीत असे म्हटले. मग बोलायला उरतेच काय असे ते म्‍हणाले.

कधी चिठ्ठ्या पाठवतात ,कधी माईक ओढतात, कधी शर्ट खेचतात, बऱ्याच गमती महाराष्ट्रात सध्या पाहायला मिळत आहेत. मी यावर काय बोलणार. खरे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत अशी प्रतिक्रिया त्‍यांना माध्यमांना दिली.

हेही वाचा :  

Back to top button