नर्‍हेत रस्त्यातील चेंबरमुळे वाहतुकीस अडथळा | पुढारी

नर्‍हेत रस्त्यातील चेंबरमुळे वाहतुकीस अडथळा

धायरी : नर्‍हे गावात भैरवनाथ भेळ ते ग्रीन व्हॅली बालाजी विश्व रस्त्यावर नाल्यावरील बाजूला धोकादायक उघडे चेंबर आहे. रस्त्याच्या मधोमध असलेल्या या उघड्या चेंबरमुळे वाहनचालकांना व नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. सहा महिने हे चेंबर उघडेच असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. अनेकदा पुणे महापालिकेच्या नर्‍हे जनसंपर्क कार्यालयात कळवूनसुद्धा कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हा परिसर मोठ्या लोकवस्तीचा आहे.

या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने, चार चाकी व दुचाकी वाहने आणि नागरिकांची सतत वर्दळ असते. बरेच दुचाकी चालक हे उघडे चेंबर दिसून न आल्यामुळे पडून जखमी झाले आहेत. त्वरित हे चेंबर दुरुस्त करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनील वाल्हेकर यांनी केली आहे. नाल्यावरील हे धोकादायक चेंबर दुरुस्त करण्यासाठी मुख्य खात्याला कळविण्यात आल्याची माहिती महापालिकेचे कनिष्ठ अभियंता नकुसा ढोले पाटील यांनी दिली.

Back to top button