गोवा : कामत व लोबो यांच्याविरोधात काँग्रेसकडून अपात्रता याचिका दाखल | पुढारी

गोवा : कामत व लोबो यांच्याविरोधात काँग्रेसकडून अपात्रता याचिका दाखल

पणजी; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत व विरोधी पक्षनेते पदावरून हटवलेले ज्येष्ठ आमदार मायकल लोबो यांच्या विरोधात गोवा प्रदेश काँग्रेसने अपात्रता याचिका दाखल केली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याने काँग्रेसने त्यांच्याविरोधात कडक पावले उचलली आहेत.

प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार, पक्षविरोधी कारवाई करणे म्हणजेच पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा देण्यासारखे असते. त्यामुळे काँग्रेसच्या गोवा प्रभारींनी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार दिगंबर कामत व मायकल लोबो यांना आमदार म्हणून अपात्र ठरवावे, अशी मागणी सभापती रमेश तवडकर यांच्याकडे केली असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने कामत व लोबो यांनी कॉंग्रेसचे ११ पैकी ८ आमदार फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या गळाला फक्त पाचच आमदार लागले. दोन तृतीयांश आमदार काँग्रेसमधून फुटले नाहीत. फुटीर गटाचे नेतृत्व करणारे दोघे आमदार काँग्रेसला नको आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. विरोधी पक्षनेते पदावरून लोबो यांची उचलबांगडी केल्यानंतर नवा विरोधी पक्षनेता आज रात्रीपर्यंत निवडला जाईल, असेही पाटकर यांनी सांगितले. भारतीय जनता पक्ष हा लोकशाहीवर विश्वास ठेवत नाही. त्यांना विरोधक नको आहेत. त्यामुळेच विरोधी पक्ष फोडत असल्याचा आरोप पाटकर यांनी भाजपवर केला.

हेही वाचलंत का ?

Back to top button