अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये एकूण अनुक्रमे 52.80 अंक व 179.95 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 15752.05 अंक व 52907.93 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये आणि सेन्सेक्स दोन्हींमध्ये एकूण 0.34 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या सप्ताहात रुपया चलनात डॉलरच्या तुलनेत पडझड नोंदवली गेली. रुपया चलनाने आतापर्यंतच्या सर्वाधिक कमकुवत पातळीला म्हणजेच 79.12 रुपये प्रती डॉलर पातळीला स्पर्श केला. शुक्रवारअखेर गुरुवारच्या तुलनेत 12 पैसे मजबुतीसह रुपयाने 78.94 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंदभाव दिला. या सप्ताहात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव स्थिर राहिले. ब्रेंट क्रुडचा भाव शुक्रवारच्या सत्रात 1.79 टक्के वधारून 110.98 डॉलर प्रती बॅरल झाला.

* वाढत्या व्यापारतुटीला आळा घालण्यासाठी आणि आयातमूल्य कमी करण्यासाठी सोन्यावरील आयात कर थेट 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आला. सोन्याच्या आयातीमुळे व्यापारतूट वाढून भारतीय चलन कमकुवत होत आहे. त्यामुळे आयात कमी करण्याच्या द़ृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले. मे महिन्यात भारतात 107 टन सोन्याची आयात करण्यात आली होती. या निर्णयापश्चात सोन्याचा भाव एमसीएक्स एक्स्चेंजवर 3 टक्के वधारून 52302 पर्यंत पोहोचला.

* खनिज तेलाचे शुद्धीकरण करून निर्यात करणार्‍या कंपन्यांना सरकारचा धक्का. पेट्रोल, डिझेल आणि विमानातील इंधन (एटीएफ फ्युएल) वरील निर्यात करामध्ये वाढ. पेट्रोलवर 6, डिझेलवर 13 आणि विमानातील इंधनामध्ये 6 रु. प्रती लिटर निर्यात कर वाढवला. त्यामुळे इंधनावरील एकूण कर 65 टक्क्यांपर्यंत वाढवला गेला आहे. या अधिकच्या करांमुळे सरकारला 65 हजार कोटींचा अधिकचा महसूल प्राप्त होईल. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे तेल उत्खनन आणि विपणन कंपन्यांच्या नफ्यावर मोठा परिणाम होईल. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सचा समभाग 7 टक्के ओएनजीसी 13.4 टक्के, तर आईल इंडियाचा समभाग तब्बल 15 टक्क्यांपर्यंत खाली आला.

* वस्तू आणि सेवा कर समितीची बैठक मागील सप्ताहात संपन्न. 1000 रु. पेक्षा कमी भाडे असणार्‍या हॉटेलवर 12 टक्के, तर 5 हजारपेक्षा कमी भाडे असणार्‍या हॉस्पिटलच्या खोल्यांवर 5 टक्के तसेच अनोंदणीकृत पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी आकारला जाणार.

* तब्बल 22 वर्षांनंतर बजाज अ‍ॅटो कंपनीकडून समभाग पुनर्खरेदी 4600 रु. प्रति समभाग दराने एकूण 2500 कोटींचे समभागांची पुनर्खरेदी होणार. यापूर्वी 2000 साली कंपनीने 400 रु. प्रति समभाग दरावर 1.8 कोटी समभाग खरेदी केले होते.

* देशातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’च्या चेअरमनपदी आकाश अंबानी यांची वर्णी. आकाश मुकेश अंबानी यांचे थोरले पुत्र असून, जिओ इन्फोकॉमकडे सध्या 41 कोटी ग्राहक असून कंपनीचा महसूल 81587 कोटी तसेच नफा 15487 कोटींचा आहे. तसेच रिलायन्स रिटेलच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांची वर्णी लागण्याची शक्यता.

* जून 2022 मध्ये वस्तू आणि सेवा करांद्वारे केंद्र सरकारला 1 लाख 45 हजार कोटींचा महसूल मिळाला. मागील वर्षी जून महिन्यात 93 हजार कोटींचा महसूल मिळाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात 56 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. वस्तू आणि सेवा कर देशात लागू होऊन मागील महिन्यात 5 वर्षे पूर्ण झाली.

* दिवाळखोर ‘रिलायन्स कॅपिटल’वर तोडगा काढण्यासाठी मसुदा सादर करण्यासाठीची तारीख चौथ्यांदा पुढे ढकण्यात आली. आता अंतिम मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली. या प्रकरणावर सर्वमान्य तोडगा काढून प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची 2 नोव्हेंबरची तारीख कायम ठेवण्यात आली आहे. रिलायन्स कॅपिटलकडे विविध वित्तसंस्थांची 23666 कोटींची देणी बाकी आहेत. टाटा एआयजी रिलायन्स कॅपिटलचा सामान्य विमा विभाग तसेच चोला मंडलम समूहाने आयुर्विमा विभाग खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे. यासोबतच पिरामल एंटरप्रायझेसदेखील रिलायन्स कॅपिटल खरेदीस उत्सुक आहे.

* केंद्र सरकार देशातील दोन महत्त्वाच्या सरकारी बँकांमधील संपूर्ण हिस्सा विक्री करण्यासाठी प्रयत्नशील. यापूर्वी एकूण 26 टक्के हिस्सा ठेवून, उरलेला हिस्सा विक्री करण्याची योजना होती. नीती आयोगाने इंडियन ओव्हरसीज बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकांचे खासगीकरण करण्याचा सल्ला दिला होता. इंडियन ओव्हरसीज बँकेत सरकारचा 96.38 टक्के, तर सेंट्रल बँकेत सरकारचा 93.08 टक्के हिस्सा आहे.

* आर्थिक वर्ष 2018 आणि 2019 मधील ‘एजीआर ड्यूज’ (थकीत कर) भरण्यासाठी भारती एअरटेल सरकारने दिलेल्या सवलतीचा वापर करणार. 3 हजार कोटींच्या थकीत कर भरण्यासाठी चार वर्षं कालावधी पुढे ढकलण्याचा मिळालेल्या सवलीचा (मोनोटोरिअम पिरेड) वापर करणार.

* परदेशी गुंतवणूकदार (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर) यापुढे भारतीय कमोडिटी डेरिव्हेटीव्हस मार्केटमध्ये सहभाग घेऊ शकतील. कृषी उत्पादन वगळता इतर कमोडिटीच्या डेरिव्हेटीव्हस
मार्केटमध्ये व्यवहार करण्याची परवानगी ‘सेबी’ने दिली.

* वाहन उद्योगातील ‘सेमी कंडक्टर चीप’ तुडवड्यावर उपाय म्हणून टाटा समूहातील कंपनीने जपानच्या रेनेसास कंपनीशी करार केला. टाटा मोटर्स, तेजस नेटवर्क्स यापुढे सेमी कंडक्टरसंबंधी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती व संशोधनासाठी रेनेसास कंपनीची मदत घेणार. यासाठी बंगलोरस्थित ‘टीसीएस’ कंपनीमध्ये एक केंद्रदेखील स्थापन केले जाणार.

* 24 जून रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 2.734 अब्ज डॉलर्सनी वधारून 593.323 अब्ज डॉलर्स झाली.

Back to top button