Gold price today : सोने आयात शुल्क वाढताच दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा दर | पुढारी

Gold price today : सोने आयात शुल्क वाढताच दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचा प्रति तोळ्याचा दर

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात (import duties on gold) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या आयातीवरील बेसिक इंपोर्ट ड्युटी याआधी साडेसात टक्के इतकी होती, ती आता १२.५ टक्क्यांवर गेली आहे. सोन्याच्या आयातीवरील शुल्क ५ टक्क्यांनी वाढवल्याचा परिणाम आज सोन्याच्या दरावर दिसून आला. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात (Gold price today) प्रति १० ग्रॅममागे ९८६ रुपयांनी वाढ झाली.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी (दि.३० जून) २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,८६३ रुपयांवर बंद झाला होता. त्यात आज शुक्रवारी (१ जुलै) ९८६ रुपयांची वाढ होऊन तो ५१,८४९ रुपयांवर पोहोचला. सोने महागले असले तरी चांदीच्या दरात घट झाली आहे. चांदीचा प्रति किलो दर ५८,८०३ रुपयांवरून ५८,४०० रुपयांवर आला आहे.

आज शुक्रवारी (Gold price today) २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ५१,८४९ रुपये, २३ कॅरेट ५१,६४१ रुपये, २२ कॅरेट ४७,४९४ रुपये, १८ कॅरेट ३८,८८७ रुपये आणि १४ कॅरेट दर ३०,३३२ रुपयांवर खुला झाला होता. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरुच आहे.

विदेशी चलन साठ्याचे कमी होत असलेले प्रमाण तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्याची मागणी कमी व्हावी, या उद्देशाने आयात शुल्क वाढविण्यात आले आहे. दरम्यान सरकारने पेट्रोल, डिझेल तसेच विमानाच्या इंधनावरील निर्यात करात ( एटीएफ) वाढ केली आहे.

आयात शुल्कात वाढ झाल्यानंतर देशातंर्गत बाजारपेठेतील सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या आयातीवरील बेसिक इंपोर्ट ड्युटी याआधी साडेसात टक्के इतकी होती, ती आता १२.५ टक्क्यांवर गेली आहे. सोन्याची जगातली दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिले जाते. देशातंर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी देशाकडून सोन्याची आयात केली जाते. आयात बिल वाढण्यात सोने मोठ्या प्रमाणात हातभार लावते, ते यामुळेच. गतवर्षीच्या सोने आयातीच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्यावर्षी सोन्याची विक्रमी आयात झाली होती. दरम्यान सरकारने पेट्रोल, डिझेल तसेच विमानाच्या इंधनावरील निर्यात करात प्रति लिटरमागे सहा रुपयांनी वाढ केली आहे. हा कर आता १३ रुपयांवर गेला आहे. दुसरीकडे घरगुती कच्च्या तेलावर टनामागे २३ हजार २३० रुपये इतका अतिरिक्त कर लावण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button