Shikhar Dhawan : धवनच्या T20 वर्ल्ड कप खेळण्यावरून गावस्करांचे मोठे विधान, म्हणाले… | पुढारी

Shikhar Dhawan : धवनच्या T20 वर्ल्ड कप खेळण्यावरून गावस्करांचे मोठे विधान, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मायदेशातील टी 20 मालिकेसाठी आणि आयर्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी भारतीय संघात युवा चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला. वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग यांना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे, तर दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंना दीर्घकाळ बाहेर राहिल्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश आले. मात्र, आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी करूनही सलामीवीर शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. अशातच आता तो अगामी टी 20 वर्ल्ड कप खेळेल का? त्याची टी इंडियामध्ये निवड होईल का? यावर अनेकांमध्ये चर्चा रंगली आहे. भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनिल गावस्कर यांनीही धवनच्या T20 वर्ल्ड कप खेळण्यावरून मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

2010 मध्ये पदार्पण केल्यापासून धवनने (Shikhar Dhawan) भारतासाठी 34 कसोटी, 149 एकदिवसीय आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने सलग 7 आयपीएल हंगामात 400 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. 36 वर्षीय शिखरने गेल्या वर्षी जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हा वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्याच्याकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कप संघातून स्थान गमावल्यानंतर शिखरने यावेळी आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जसाठी बॅटने चांगली कामगिरी केली. मात्र, असे असूनही द. आफ्रिकेविरुद्धच्या आणि आयर्लंडविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली नाही.

सलामीवीर शिखरला (Shikhar Dhawan) आता ऑस्ट्रेलियात यंदा होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवणे कठीण जात आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांचे आहे. गावस्कर म्हणाले की, दिल्लीचा हा खेळाडू 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघात स्थान मिळवू शकेल अशी कोणतीही शक्यता नाही.

एका क्रीडा वाहिनीला मुलाखत देताना गावस्कर (Sunil Gavaskar) म्हणाले की धवन (Shikhar Dhawan) राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल असे मला वाटत नाही. अगामी टी-20 वर्ल्ड कपच्या रेसमध्ये त्याचे नाव दिसत नाही. सध्या तरी शिखर धवनचे नाव संघात सामील होताना दिसत नाही. धवनच्या नावाचा समावेश इंग्लंड दौऱ्यासाठी करण्यात आलेला नाही. जर त्याला पुनरागमन करायचे असते तर इंग्लंड दौऱ्यासाठी धवनची नक्कीच निवड झाली असती. पण तसे झालेले नाही.

जर शिखर (Shikhar Dhawan) धवनची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्याची टी-20 विश्वचषकासाठी देखील निवड केली जाणार नाही. धवनने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने 14 सामन्यात एकूण 460 धावा केल्या. याशिवाय, सलग सात आयपीएल हंगामात 400 हून अधिक धावा करणारा तो फलंदाज आहे, पण आता पुढचे चित्र वेगळे आहे, असेही गावस्करांनी व्यक्त केले

रोहित शर्मा आणि केएल राहुल हीच जोड़ी आहे, जी ओपनिंग करेल. या व्यतिरिक्त आणखी कसलीच शक्यता नाही. पण सध्या राहुल जायबंदी आहे. पण तो यातून बाहेर पडेल त्यानंतर पुन्हा तो रोहितसह ओपनिंग करताना दिसेल.

रोहित इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात पुनरागमन करत आहे मात्र राहुल उपचारासाठी जर्मनीला जाणार आहे.

Back to top button