दिनेश कार्तिक देतोय ऋषभ पंतला ‘चॅलेंज’ | पुढारी

दिनेश कार्तिक देतोय ऋषभ पंतला ‘चॅलेंज’

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात शुक्रवारी भारताने मोठा विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात दिनेश कार्तिकने अर्धशतक झळकावले. दिनेश कार्तिक याने वयाच्या 37 व्या वर्षी 27 चेंडूंत 55 धावांची खेळी करीत टी-20 हा तरुणांचा खेळ आहे, अशी हाकाटी पिटणार्‍यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. आयपीएल 2022 मध्ये त्याने रॉयल चॅलेंजर बंगलोर संघाला अनेक सामने फिनिश करून दिले आहेत. तीच कामगिरी आता त्याला टीम इंडियासाठी करण्याची जबाबदारी आली आहे. तो मूळचा यष्टिरक्षक असला, तरी आता तो संघात फिनिशरच्या भूमिकेत आहे आणि संघाचा यष्टिरक्षक ऋषभ पंत मात्र फलंदाजीत अपयशी ठरत आहे.

यंदाचा विश्वचषक जवळ येत असताना पंतचे फॉर्ममध्ये नसणे आणि कार्तिकला नव्याने बाळसे येणे ही पंतसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कारण, रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुल संघात परतले, तर कार्तिकला सातव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संघात जागा मिळत नाही. अशावेळी त्याला अंतिम अकराजणात सहभागी करून घ्यायचे असेल, तर पंतला वगळण्याशिवाय पर्याय उरत नाही.

महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला

दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्याचे पदार्पण दक्षिण आफ्रिकेमध्ये डिसेंबर 2006 मध्ये केले होते. विशेष म्हणजे, हा भारताचा पहिला टी-20 सामना होता आणि त्या सामन्यात खेळलेला दोन्ही देशांतील कोणताही खेळाडू आज क्रिकेट खेळत नाही. सहाव्या स्थानावर सामन्यात त्याने नाबाद 31 धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर त्याने तब्बल 16 वर्षांनंतर प्रथमच अर्धशतकी खेळी केली. विशेष म्हणजे, या खेळीमुळे त्याने महेंद्रसिंग धोनीच्या नावावरील विक्रम मोडला.

यापूर्वी धोनीने 2018 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी 50 धावांची खेळी केली होती. आता दिनेश कार्तिक टी-20 मध्ये सर्वाधिक वय असताना अर्धशतक झळकावणारा खेळाडू ठरला आहे. दिनेश कार्तिक याने 37 वर्षे 16 दिवस वयात ही कामगिरी केली. तर महेंद्रसिंग धोनी याने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच 36 वर्षे 229 दिवस असताना अर्धशतक झळकावले होते. शिखर धवन याने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 35 वर्षे 1 दिवस असताना अर्धशतक केले होते.

क्रिकेट सोडून कॉमेंट्री करू लागला होता कार्तिक!

2019 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव झाला आणि यानंतर काही काळ कार्तिक खेळापासून लांब झाला. तो क्रिकेट समालोचन (कॉमेंट्री) करू लागला होता. यावेळी ब्रिटनमधील काही क्रिकेट समीक्षकांनी त्याचे क्रिकेटमधील करिअर संपले, असे सांगायला सुरुवात केली होती. मात्र, यानंतर तो नवे स्वप्न घेऊन मैदानात उतरला. तामिळनाडू संघाला नव्या उंचीवर नेले. तसेच आयपीएल 2022 मध्ये 330 धावा करत आपले क्रिकेट संपलेले नाही, हे त्याने दाखवून दिले.

खिल्ली उडविणार्‍यांना दिले सडेतोड उत्तर

दिनेशचे वय झाले आहे, आता या वयात त्याला टीम इंडियाकडून टी-20 खेळायचे आहे, असे म्हणत अनेकांनी दिनेश कार्तिकची खिल्ली उडवली होती. काहींनी हा केवळ एका मालिकेतच चांगली कामगिरी करतो, अशीही बडबड केली होते. चोहो बाजूंनी टीका होत असताना दिनेशने केवळ आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले. त्याने विश्लेषकांच्या टीकेला कधीच भीक घातली नाही. तब्बल तीन वर्षांनंतर त्याने टी-20 साठी टीम इंडियात पुनरागम केले. आपल्या दमदार खेळीने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले.

Back to top button