बेळगावसह 80 ठिकाणी एसीबीचे छापे | पुढारी

बेळगावसह 80 ठिकाणी एसीबीचे छापे

बेळगाव पुढारी वृत्तसेवा : बेळगावचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता भीमराव यशवंत पवार यांच्यासह राज्यभरात २१ अधिकार्‍यांवर शुक्रवारी पहाटे एकाच वेळी लाच प्रतिबंध विभाग अर्थात एसीबीने छापे टाकले. बेळगाव, निपाणी, बोरगाव यांसह राज्यात तब्बल ८० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांतून कोट्यवधींची मालमत्ता तसेच कागदपत्रे जप्त करण्यात आली असून, हिशेब लावण्याचे काम सुरू आहे.

बेळगाव पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता पवार यांचे बेळगाव-टिळकवाडी येथील घर व कार्यालय तसेच निपाणी व बोरगाव येथील नातेवाईकांच्या घरावर शुक्रवारी पहाटे छापे टाकण्यात आले. बोरगावमध्ये पवार यांच्या मुलाचा कारखाना असल्याचे समजते. त्या कारखान्यासह कार्यालय आणि घरातून काही रोकड व मालमत्तेसंबंधीची कागदपत्रे जप्त करण्यात आली. भीमराव पवार हे येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात अधीक्षक अभियंता आहेत. त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक मालमत्ता असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे झाली होती. त्याचा आधार घेऊन एसीबीचे उत्तर विभाग जिल्हा पोलिस प्रमुख बी. एस. न्यामगौड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील एसीबीचे उपअधीक्षक करूणाकर शेट्टी, निरीक्षक अडिवेश गुदीगोप्प, निरंजन पाटील, नियाज बेग, मंजुनाथ यांच्यासह 25 हून अधिक अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांनी हे छापे घातले.

शुक्रवारी पहाटे सहाच्या सुमारास एसीबीची सहा पथके बेळगावसह निपाणी व बोरगावला रवाना झाली. पवार यांचे टिळकवाडी येथील घर, कार्यालय, त्यांचे मुख्य कार्यालय, निपाणी येथील त्यांचे तसेच नातेवाईकांचे घर व बोरगाव येथील त्यांची पत्नी व मुलांच्या नावे असलेल्या टेक्स्टाईल पार्कमध्ये असलेली इमारत या ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. सहा ठिकाणी छापे टाकून रोख रक्कम, व मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली.

रात्री उशिरापर्यंत छाननी

बेळगाव तसेच बोरगावात पहाटे सुरू झालेली छाननी रात्री अकरापर्यंत सुरूच होती. पवार तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या नावे असलेल्या मालमत्ता, बँक खाती, रोकड, दागिने अशा सार्‍या संपत्तीची मोजदाद सुरु आहे. भीमराव पवार यांचे कामाचे ठिकाण असलेल्या बेळगावात रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची छाननी सुरू होती. यामध्ये मोठी मालमत्ता हाती लागल्याचा दावा एसीबी अधिकार्‍यांनी केली आहे.

निपाणी व बोरगाव येथेही रात्री दहापर्यंत कागदपत्रे, दागिने व रोख रकमेची मोजदाद सुरू होती.हा मुद्देमाल घेऊन निपाणी व बोरगातील पथके रात्री बेळगावला दाखल झाली. तिन्ही ठिकाणांच्या छाप्यातील मुद्देमाल एकत्र करून त्यानंतर त्याचे मूल्यांकन केले जाणार आहे. काही कागदपत्रांची छाननी अद्याप बाकी असून ती छाननी उद्या होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी वर्तवली. वरिष्ठ अधिकारी रात्री उशिरापर्यंत पवार यांच्या घरी ठाण मांडून होते. पंचवीस अधिकारी व कर्मचार्‍यांपैकी तब्बल 15 अधिकारी शहरातील टिळकवाडी येथील घर, तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे किल्ल्यामधील कार्यालयात रात्रीपर्यंत तपास करत होते. बेळगावबरोबरच कारवारमध्येही जिल्हा नोंदणी अधिकारी श्रीधर यांच्यावर एसीबी छापे पडले.

२१ अधिकार्‍यांना दणका : कोट्यवधींच्या बेहिशोबी मालमत्तेचा तपास सुरु

पाचशे पन्‍नास अधिकार्‍यांचे पथक

राज्यातील 21 अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचा आरोप होता. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) त्या अधिकार्‍यांची घरे आणि कार्यालयांसह 80 ठिकाणी शुक्रवारी एकाचवेळी छापे घातले. 550 अधिकार्‍यांच्या पथकांनी 80 ठिकाणी तपास केला. कारवारमधील जिल्हा निबंधक श्रीधर यांच्या बंगळूर येथील एचएसआर लेआऊटमधील निवासावर एसीबीने छापा घातला. नेलमंगला येथील मैलानहळ्ळीतील घरावर तसेच कारवार येथील घरावर आणि कार्यालयावर एकाचवेळी छापे घालून तपास करण्यात आला.

छापे घालण्यात आलेले अधिकारी मधुसूदन (जिल्हा नोंदणी अधिकारी,आयजीआर), भीमराव वाय. पवार (अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी बेळगाव), श्रीधर (जिल्हा नोंदणी अधिकारी कारवार), हरीश (साहाय्यक अभियंता, पाटबंधारे खाते), रामकृष्ण एच. व्ही. (साहाय्यक कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे खाते, हासन), राजीव पुरसय्या नाईक (सार्वजनिक बांधकाम साहाय्यक अभियंता, कारवार), बी. आर. बोपय्या (कनिष्ठ अभियंता, पोन्नमपेठे जिल्हा पंचायत), परमेश्वर (साहाय्यक अभियंता, लघु पाटबंधारे खाते हुवीनहडगली), यल्लप्पा एन. पडसाली (आरटीओ, बागलकोट), शंकरप्पा नागप्पा गोगी (योजना संचालक, निर्मिती केंद्र बागलकोट), प्रदीप एस. आलूर (पंचायत ग्रेड टू सचिव, आरडीपीआर गदग), सिद्दप्पा टी. उपमुख्य वीज अधिकारी बंगळूर), तिप्पण्णा पी. निरसगी (जिल्हा योजनाधिकारी बिदर), मृत्युंजय चेन्नबसय्या तिराणी (साहाय्यक कंट्रोलर, कर्नाटक पशुवैद्यकीय, प्राणी व मत्स्योद्योग विद्यापीठ बिदर), मोहन कुमार (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे खाते चिक्कबळ्ळापूर), मंजुनाथ जी. (निवृत्त कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम खाते), शिवलिंगय्या (बीडीए), उदय रवी (पोलिस निरीक्षक कोप्पळ), बी. जी. तिम्मय्या (केस वर्कर, कडूर नगरपालिका), चंद्रप्पा सी. होळेकर (युटीपी कार्यालय राणीबेन्नूर), जनार्दन (निवृत्त रजिस्ट्रार मूल्यमापन, भूमी).

हेही वाचा

Back to top button