सोलापूर : केंद्र सरकारचा पुतळा जाळताना काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत झटापट | पुढारी

सोलापूर : केंद्र सरकारचा पुतळा जाळताना काँग्रेस कार्यकर्ते-पोलिसांत झटापट

सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा केंद्रातील सरकार ईडीचा वापर करुन गांधी घराण्यातील नाहक त्रास देत असल्याचा आरोप करीत शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात पोलिस व कार्यकर्त्यांत चांगलीच झटापट झाली. यावेळी पोलिसांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न हाणून पाडला.

देशाला सर्वस्व अर्पण केलेल्या गांधी परिवाराला अडचणीत आणण्यासाठी मोदी सरकार सूडबुद्धीने कारवाई करीत असल्याची भावना यावेळी पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. याविरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, गांधी परीवाराने सर्वस्व त्याग करून देशासाठी बलिदान दिले. अशा परिवारातील काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया व राहुल यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या नोटिसा पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. तीन दिवस राहुल गांधी यांचा चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे.

काँग्रेसचा कार्यकर्ता मोदी सरकारची ही दडपशाही सहन करणारा नाही. या आंदोलनात माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, महापालिकेचे माजी गटनेते चेतन नरोटे, बाळासाहेब शेळके, दादासाहेब साठे, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, मनीष गडदे, अलकाताई राठोड, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, शिवलिंग बाटलीवाला, मा. नगरसेविका अनुराधा काटकर, भीमाशंकर जमादार, अर्जुनराव पाटील, सुधीर लांडे, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनंजय पवार, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, भीमराव बाळगे, तालुका अध्यक्ष शालिवाहन माने देशमुख आदींनी सहभाग घेतला.

Back to top button