सदाभाऊ खोतांकडे उधारी मागणारा ‘तो’ हॉटेल मालक स्वाभिमानीचा कार्यकर्ता : राजू शेट्टी | पुढारी

सदाभाऊ खोतांकडे उधारी मागणारा ‘तो’ हॉटेल मालक स्वाभिमानीचा कार्यकर्ता : राजू शेट्टी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा: सदाभाऊ खोत यांच्याकडे उधारी मागणारा हॉटेल मालक अशोक शिनगारे हा कार्यकर्ता पूर्वी आमच्या संघटनेत सक्रिय होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्याने आम्हाला साथ दिली, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

सांगोला तालुक्यातील मांजरी येथील एका हॉटेलवाल्याने गुरूवारी (दि.१६) माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना अडवून २०१४ सालची उधारी मागितली होती. त्यावर सदाभाऊ खोत यांनी ‘मी याची कसलीही उधारी केलेली नाही आणि अशोक शिनगारे याला मी ओळखत नाही. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला पाठवून हा स्टंट केला आहे, असा आरोप केला होता.

याच दरम्यान सदाभाऊ खोत यांचे एकेकाळचे सहकारी राजू शेट्टी यांनी मात्र अशोक शिनगारे या आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला सक्रिय कार्यकर्ता होता. तो जेव्हा सक्रिय होता तेव्हा त्याने काही आंदोलनातही सहभाग घेतला होता. आता तो आमच्या संघटनेत नाही. मात्र, पूर्वी होता. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत त्याने आमच्या उमेदवाराला सहकार्य केले होते असे म्हटले आहे.

राजू शेट्टी यांनी अशोक शिनगारे हा आमचा कार्यकर्ता होता, असे सांगितल्याने ‘त्याला ओळखत नाही’ असे म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांची मात्र अडचण झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button