नगर: आई-वडिलांच्या त्रासामुळे संपविले जीवन, आजोबांच्या फिर्यादीने घटनेला मिळाले नवे वळण; गुन्हा दाखल
वांबोरी : वडिलासह सावत्र आईकडून नेहमी होणार्या त्रासाला कंटाळून कुणाल चौधरी या 17 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्घटना राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे 7 जून रोजी घडली. दरम्यान, याप्रकरणी प्रारंभी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली हाती, मात्र मृत युवकाच्या आजोबांनी त्याचे वडिल व सावत्र आईविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दाखल केल्याने या दुर्घटनेस वेगळे वळण मिळाल्याचे चर्चा सुरु आहे.
राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथील कुणाल प्रकाश चौधरी (वय 17) 12 वी ची परिक्षा दिली होती. 7 जून रोजी दुपारी त्याचा निकाल लागणार होता, मात्र निकाल येण्यापूर्वीच त्याने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र काल मृत कुणाल चौधरी याचे आजोबा जालिंदर भानूदास ढोकणे (रा. उंबरे) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मृत कुणाल प्रकाश चौधरी याला त्याचे वडील प्रकाश चौधरी व सावत्र आई सुवर्णा ऊर्फ ज्योती चौधरी नेहमी त्रास देत होते. 12 वीमध्ये चांगले मार्क पडले नाही तर तुला घरातुन हाकलुन देईन, असे म्हणत शिवीगाळ करुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती.
दरम्यान, मृत कुणाल याची सख्खी आई ऊषा चौधरी यांच्या डोक्याचे ऑपरेशन झाल्यापासून वडील प्रकाश चौधरी याने दुसरे लग्न केले. यानंतर पहिली पत्नी ऊषा यांना नांदविले नाही. वेळोवेळी शारीरिक व मानसिक त्रास दिला. या कारणावरुन प्रकाश चौधरी व दुसरी पत्नी सुवर्णा ऊर्फ ज्योती प्रकाश चौधरी यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून कुणाल याने राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
जालिंदर ढोकणे यांच्या फिर्यादीवरून मृत मुलाचे वडील प्रकाश कारभारी चौधरी व सावत्र आई सुवर्णा ऊर्फ ज्योती प्रकाश चौधरी यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दरम्यान, मृताचे वडील व सावत्र आई पसार झाली असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आजोबांनी याप्रकरणाला खरी वाचा फोडल्याने मृत नातवाला न्याय मिळणार असल्याचे बोलले जाते. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व पोलिस उप निरीक्षक चारूदत्त खोंडे करीत आहेत.