हिंगोली : वादळी वार्‍यात केळीच्या बागा उद्ध्वस्त; ८० कोटींचे नुकसान | पुढारी

हिंगोली : वादळी वार्‍यात केळीच्या बागा उद्ध्वस्त; ८० कोटींचे नुकसान

वसमत; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कुरुंदा व परिसरात झालेल्या वादळी वार्‍यामुळे केळीच्या बागा उद्‍ध्‍वस्‍त  झाल्या आहेत. महसूल प्रशासनाने गुरुवारी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले. प्राथमिक सर्वेक्षणानुसार, ५०० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या पिकांचे तब्बल ८० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी व्यक्त केला आहे.

वसमत तालुक्यातील कुरुंदा व परिसरात केळीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. या परिसरातील केळीला नांदेड व इतर बाजारपेठेत मोठी मागणी आहे. सध्या केळीचे घड काढण्यासाठी आले असून, काही व्यापार्‍यांनी शेतकर्‍यांसोबत केळी खरेदीचा सौदा देखील केला होता. मात्र, बुधवारी दुपारी आलेल्या वादळी वार्‍यासह पावसामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक ठिकाणी केळीचे घड खाली पडले असून झाडेदेखील तुटून पडली आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अरविंद बोळंगे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी आज सकाळपासून प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करण्यास सुरवात केली आहे. या पथकाने कुरुंदा, गिरगाव, खाजमापूरवाडी, दाभडी, सोमठाणा, परजना या भागात पाहणी केली असता सुमारे ४५० ते ५०० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये ४०० शेतकर्‍यांचे सुमारे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे बोळंगे यांनी सांगितले.

या संदर्भात प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करण्याचे काम सुरु असून नुकसानीचे क्षेत्र व झालेले नुकसान याची अंतिम आकडेवारी शुक्रवारपर्यंत स्पष्ट होणार असल्याचे महसूल विभागाच्या सुत्रांनी सांगितले. यावेळी अनेक शेतकर्‍यांनी पथकासमोर व्यथा मांडल्या. शेतात केळीचे घड काढणीच्या अवस्थेत असून काही व्यापार्‍यांनी सौदे देखील केले आहेत. कधी नव्हे ते केळीला १९ ते २१ रुपये किलोचा भाव मिळू लागला आहे. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर वादळी वार्‍याच्या तडाख्याने पाणी फेरल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. आता शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button