

भोर : पुढारी वृत्तसेवा
भोर तालुक्यात जे निराधार लाभार्थी विविध योजनांचा लाभ घेतात, अशा निराधार व्यक्तींनी उत्पन्न दाखला व हयातीचा दाखला 30 जूनपर्यंत तहसीलदार कार्यालयात जमा करावा; अन्यथा अर्थसाहाय्य बंद होईल. लाभार्थ्यांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून निराधारांसाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष साहाय्य कार्यक्रमातील संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजनांचा लाभ घेणार्यांना नवीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी 30 जून ही अंतिम मुदत असून, दाखला मिळविण्याकरिता लाभार्थींची धडपड सुरू असून, तलाठी व तहसील कार्यालयात गर्दी वाढत असल्याचे चित्र आहे. निराधारांना पेन्शन योजनेचा अल्पसा असलेला आधारही हयात प्रमाणपत्र व एका दाखल्याअभावी नाहीसा होऊ शकतो.
भोर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या विविध योजनांचे 7 हजार 516 लाभार्थी आहेत. त्यांना शासनाकडून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 9 कोटी 50 लाख 21 हजार 900 बँक खात्यांमध्ये जमा अनुदान प्राप्त झाले आहे. या लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत आहे. मात्र, यापुढील मानधन मिळण्यासाठी भोर तालुक्यातील सर्व लाभार्थींनी हयातीचे प्रमाणपत्र संबंधित बँकेत भरून द्यावे; जेणेकरून सर्व बँकांना हयात प्रमाणपत्रे गोळा करून एकत्रित तहसील कार्यालयात जमा करावे, असे आवाहन केले आहे.
https://youtu.be/IYYU1mogoqk