Nashik : आमचा तिसरा डोळा उघडल्यास सरकार जबाबदार- आ. नितेश राणेंचा इशारा | पुढारी

Nashik : आमचा तिसरा डोळा उघडल्यास सरकार जबाबदार- आ. नितेश राणेंचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हिंदू देवतांचा अवमान करणार्‍यांना राज्य सरकार आणि पोलिस पाठीशी घालत आहेत. सोशल मीडियावर शिवलिंगाची विटंबना करणार्‍या नाशिक येथील तरुणाविरोधात कारवाई झाली नाही, तर आमचा तिसरा डोळा उघडला व हिंदू संघटनांचा तोल ढासळल्यास, त्याला पोलिस जबाबदार असतील, असा इशारा भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी दिला.

भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी (दि.7) नाशिक येथे मोर्चा काढला. या मोर्चासाठी नाशिकमध्ये आलेल्या नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदत घेतली. यावेळी राणे यांनी राज्य सरकार व पोलिसांवर टीका केली. कोणत्याही धर्माच्या देवीदेवतांचा अवमान करणार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अवमानजनक कविता सोशल मीडियावर टाकली म्हणून एका मुलीला अनेक दिवसांपासून तुरुंगात टाकले आहे. नूपुर शर्माविरोधात महाराष्ट्रात तक्रार दाखल करून त्यांना समन्स बजावले आहे. मात्र, नाशिकमध्ये शिवलिंगाविषयी अवमानजनक पोस्ट करणार्‍या तरुणाविरोधात पुरावे, नाव, पत्ता देऊनही कारवाई केली जात नाही. या उलट हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला माफीचा व्हिडिओ करण्यास सांगतो, असे पोलिस बोलत आहेत, असा आरोप करीत राणे म्हणाले, तुमच्या नेत्यांचा अवमान झाला, तर पोलिस जसे सतर्क होऊन कारवाई करतात, त्याचप्रमाणे हिंदूंच्या देवी-देवतांचा अवमान करणार्‍यांविरोधातही पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे.

कारवाई झाली नाही, तर यापुढे मोर्चाही नाही व तो शांततेत नसणार, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर सतीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शिवसैनिकाला सुरक्षित मते का नाहीत?
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातून संजय राऊत व संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्याबाबत नीतेश राणे म्हणाले, संजय पवार हे निष्ठावान शिवसैनिक असल्यामुळे त्यांना शिवसेनेची सुरक्षित मते द्यावीत व उरलेली मते संजय राऊत यांना द्यावीत, असे सांगतानाच संजय राऊत शिवसैनिक नसल्याची टीका त्यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button