बीड : नायब तहसीलदार बहिणीवर हल्ला करणाऱ्या भावास १० जूनपर्यंत पोलीस कोठडी | पुढारी

बीड : नायब तहसीलदार बहिणीवर हल्ला करणाऱ्या भावास १० जूनपर्यंत पोलीस कोठडी

केज (बीड); पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दि. ६ जून रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान सख्ख्या भावाने बहिणीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्याबाबतीत ही घटना घडली. त्यांच्या भावाने तहसील कार्यालयात कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मधुकर वाघ असे त्या व्यक्तीचे नाव आहे. आशा वाघ यांच्यावर लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या आरोपीवर दहा जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, दि. ६ जून रोजी दुपारी १२ च्या दरम्यान केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड यांच्यावर त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने हा हल्ला केला. वडिलोपार्जित जमिनीच्या आणि कौटुंबिक कलहातून हा प्रकार घडला.

तहसील कार्यालयातील आस्थापना शाखेच्या कक्षात धारदार कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले. या हल्ल्यात आशा वाघ यांच्या हातावर आणि डोक्यात मार लागला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. केज येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तात्काळ प्रथमोचार करण्यात आले. त्यानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे इतर सर्व तपासण्या करण्यात आल्या. सध्या त्यांच्यावर पुढील उपचारासाठी लातूर येथील लहाने हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.

दरम्यान, केज पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग यांनी लातूर येथून रुग्णालयातून त्यांचा जबाब घेऊन दि. ७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हल्लेखोर मधुकर वाघ याला दि. ७ जून रोजी न्यायालयात समोर हजर केले असता त्याला दि. १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रभारी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा

Back to top button