नाशिक : साहेब, हे पाणी तुम्ही तरी पिऊन दाखवा! बारा बंगला भागात दूषित पाणीपुरवठा; महिलांचा ठिय्या | पुढारी

नाशिक : साहेब, हे पाणी तुम्ही तरी पिऊन दाखवा! बारा बंगला भागात दूषित पाणीपुरवठा; महिलांचा ठिय्या

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
अस्वच्छ पाणीपुरवठ्याने हैराण महिलांनी थेट प्रभाग कार्यालय गाठत बाटलीत नेलेले पाणी प्रभाग अधिकार्‍यांना पिण्याचा हट्ट धरला. अधिकार्‍यांनी बुधवारी होणारा पाणीपुरवठा स्वच्छ असेल, अशी ग्वाही दिल्यानंतर महिलांनी माघार घेतली.

बारा बंगला भागात दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा झाला, त्यामुळे संपूर्ण भागातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मालेगाव युवा संघटनेच्या महिला फोरमच्या मोनाली पाटील यांनी अस्वच्छ पाण्याच्या बाटल्या परिसरातून संकलित केल्या. त्या घेऊन महिलांसमवेत प्रभाग कार्यालय गाठण्यात आले. प्रभाग अधिकारी यांना ते पाणी पिणार का, असा प्रश्न केला. अशुद्ध पाण्यामुळे आबालवृद्धांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यास मनपा प्रशासन जबाबदार आहे. अधिकार्‍यांनी हे पाणी प्यावे, तरच आम्ही येथून जाऊ, अशी भूमिका घेत प्रभाग अधिकार्‍यांच्या कार्यालयात ठिय्या देण्यात आला. भूमिगत गटार करताना योग्य नियोजन नसल्याने जलवाहिनी तुटल्या. त्या तत्काळ दुरुस्त केल्या गेल्या नाहीत, तरी ठेकेदाराला नोटीस का दिली जात नाही, प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे, असा सवाल देवा पाटील यांनी केला. प्रभाग अधिकारी बडगुजर यांनी शुद्ध पाणीपुरवठ्याची ग्वाही दिली. त्याप्रमाणे स्वच्छ पाणी न आल्यास हंडा मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला. आयुक्त कार्यालयात पूर्ण वेळ थांबत नसल्याची खंत आंदोलक महिलांनी व्यक्त करीत, आयुक्तसाहेब मालेगावात या, मालेगावात राहा, मीटिंग सोडा, कृती करा, स्वच्छ पाणी द्या, अशा घोषणा यावेळी दिल्या. यावेळी संगीता जैन, प्रियांका वडेरा, मीना शाह, रिंकू जैन, धनश्री कोतकर, अनिता छाजेड, संध्या पिंगळे, सुरेखा शिरुडे, ललिता अमृतकर, प्रमिला अग्रवाल आदी महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा:

Back to top button