जखमी प्राणी ‘अनाथ’; देखभाल, उपचारांसाठी प्राणीमित्रांवर भिस्त

शहराबाहेर सापडलेला कोल्ह्याचे पिल्लू. तसेच शहरात जखमी अवस्थेत आढळलेला पक्षी आणि उपचार सुरू असलेले उदमांजर.
शहराबाहेर सापडलेला कोल्ह्याचे पिल्लू. तसेच शहरात जखमी अवस्थेत आढळलेला पक्षी आणि उपचार सुरू असलेले उदमांजर.

वर्षा कांबळे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जैवविविधतेने समृद्ध आहेच, परंतु येथून बरेच प्राणी नामशेष झाले व बरेच नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. शहरात दररोज 15 ते 20 प्राणी जखमी अवस्थेत सापडतात. त्यांच्यावर उपचार आणि त्यांची देखभाल करण्याची भिस्त प्राणीमित्रांवर आहे. मात्र, प्राणी आणि पक्ष्यांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. यासाठी शहरात जखमी प्राण्यांना सांभाळण्यासाठी अनाथालयाची गरज आहे.पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पिंपरी, चिंच आणि वड या झाडांमुळे पडली. पण ही झाडे माणसांनी लावली असे नाही.

तर शहरात असणार्‍या प्राणी आणि पक्ष्यांमुळे हे शहर समृद्ध झाले आहे. त्यांच्याद्वारे झाडांच्या बिया इतर ठिकाणी पडून ही वृक्षवाढीस हे घटक पोषक ठरले आहेत. पण आता ही ओळख पुसली जात आहे. पक्षी हे निसर्गचक्रातील एक महत्त्वाचे घटक. वेगवेगळ्या कारणाने पक्षी आणि प्राणी यांचे दुखापतीदरम्यान मृत्यू होत आहेत. यामध्ये काही उष्माघातामुळे, काही विजेच्या धक्क्याने, काही वाहनांमुळे झालेल्या अपघातामुळे मृत्युमुखी पडतात किंवा जखमी होतात, तर काहींना क्रूरतेने मारले देखील जाते.

शहरातील अशा बर्‍याच प्राण्यांच्या जाती आहेत. ज्या प्राण्यांचा अधिवास वर्षावनात तसेच डोंगराळ भागात आहे. आपल्याकडील जखमी प्राण्यास उपचाराकरिता बाहेर घेवून जावे लागते. त्यामुळे बरेच प्राणी प्रवासातच जीव सोडतात. शहरातील प्राणी बाहेर त्यांच्यावर शहरातच उपचार करून त्यांना मुक्त केले पाहिजे. दिवसाला वन्यजीव रक्षकाच्या माध्यमातून 20 पेक्षा जास्त प्राण्यांना जीवदान देण्यात येते. यात 15 ते 20 टक्के प्राण्यांना उपचाराची फार गरज असते.

मात्र, त्यांना योग्य उपचार मिळत नाहीत. जरी मिळाले तरी त्यांचा सांभाळ करता येत नाही. हे जखमी प्राणी उपचाराकरिता जरी कोणी स्वत: जवळ ठेवले तरी तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. शहरामध्ये विविध प्राणीमित्र संस्थांकडून वन्यजीव प्राण्यांना जीवदान दिले जाते. या प्राण्यांवर प्राथमिक उपचार केले जातात. मात्र, परिस्थिती गंभीर असल्यास नाईलाजास्तव त्यांना बाहेर उपचारासाठी नेले जाते. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात वन्यजीवांच्या संरक्षणासाठी अनाथालयांची व्यवस्था करुन प्राण्यांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

अनाथालय हवे…

आता काही दिवसांपूर्वी एक ऊदमांजर सापडले होते. त्याला 90 टक्के डिहायड्रेशन झाले होते. त्याला सलाईन लावण्यापासून पूर्ण उपचार प्राणी मित्रांकडूनकरण्यात आले. पुण्यातील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयामध्ये शहरात जखमी झालेल्या प्राण्यांवर उपचार आणि निवार्‍याची सुविधा आहे. शहरातील अति गंभीर जखमी प्राण्यांना उपचारासाठी कात्रजच्या प्राणी संग्रहालयात न्यावे लागते. यामध्ये कधी त्यांचा रस्त्यातच मृत्यू होतो. यासाठी कात्रजच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात देखील एखादे जखमी प्राण्यांवर उपचार करणारे त्यांचा सांभाळ करणारे अनाथालय असावे. प्रत्येक शहरामध्ये काहीना काही सोय आहे. आपल्या शहरात नाही. अनाथालय झाले तर शहरातील प्राण्यांना न्याय मिळेल आणि शहराची जैवविधिता टिकेल.

आपल्या शहरात जैवविविधता जपली जात नाही. फक्त वृक्षारोपण आणि स्वच्छता यावरच भर दिला जातो. आपल्याकडे जखमी अवस्थेत पक्षी सर्वात अधिक आढळतात. कावळे जखमी पक्ष्यांवर हल्ला करून मारतात. चित्रबलाकवर कुत्र्यांचा हल्ला, ओरिएंटल ड्वार्क फिशरवर हल्ला, प्राण्यांमध्ये ऊद मांजर, बिबट्या, कोल्हा, स्क्विलर यांच्यावर हल्ला झालेली उदाहरणे आहेत.

पूर्वी गिधाडांची संख्या अधिक होती ती देखील कमी झाली आहे. सर्पोद्यानात उपचारासाठी प्राण्यांना ठेवावे तर तिथे प्राण्यांना फक्त मांस दिले जाते. मात्र, काही प्राणी आणि पक्ष्यांना दूध आणि मासे द्यावे लागतात ते मिळत नाहीत. त्यामुळे उपचाराबरोबर आहाराची गरज असते अशा काही गोष्टी आहेत. ज्यासाठी त्यांना वेगळी व्यवस्था हवी.

                                 -शुभम पांडे, संस्थापक, वर्ल्ड फॉर नेचर, संस्थापक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news