कर्नाटक : बंदी घातलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर ; तपास सुरू

कर्नाटक : बंदी घातलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर ; तपास सुरू
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा

सॅटेलाईट कॉलवर कर्नाटकात बंदी घालण्यात आली आहे. पण काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारचे कॉल करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. आता पुन्हा एकदा गेल्या दहा दिवसांत कारवारसह किनारपट्टी भागातील चार ठिकाणांहून सॅटेलाईट कॉल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

23 ते 29 मे या काळात मंगळूरमधील दोन ठिकाणे, चिक्‍कमंगळूरमधील एक आणि कारवार जिल्ह्यातील घनदाट जंगलातून एक सॅटेलाईट कॉल करण्यात आल्याचे सिग्‍नल मिळाले आहेत. सिग्‍नल मिळालेल्या ठिकाणांची माहिती घेण्यात येत आहे. अंतर्गत सुरक्षा विभागातील अधिकार्‍यांनी त्या ठिकाणी पाहणी केली आहे. तपास हाती घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या सॅटेलाईट फोनचा वापर करणार्‍या व्यक्‍तींचा शोध घेण्यात येत आहे.

कारवारमधील यल्‍लापूर-शिर्सीदरम्यान घनदाट जंगल आहे. येथून सॅटेलाईट फोनचा वापर झाल्याचे सिग्‍नल मिळाले आहेत. मंगळूर शहराच्या बाहेरील बाजूस असणारे नाटेकल, कुळाई व चिक्‍कमंगळुरातील कडूर-बिरूरदरम्यानच्या घनदाट जंगलात सॅटेलाईट फोनचा वापर करण्यात आला आहे. केंद्रीय गुप्‍तचर विभागाने राज्य पोलिसांना याविषयीची माहिती कळवली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
देशविरोधी विध्वंसक कारवाया करणार्‍यांकडून नेहमीच सॅटेलाईट फोनचा वापर केला जातो. याआधी संशयित दहशतवाद्यांकडून अशा प्रकारचे फोन वापरण्यात आल्याचे आढळले होते. घनदाट जंगलातूनही या फोनचा वापर करता येतो. यासाठी टॉवरची गरज नसते. रेडिओ तरंगांचा वापर करुन संपर्क साधता येतो.

विधानसभेत चर्चा

गत विधानसभा अधिवेशनावेळी सॅटेलाईट फोनबाबत चर्चा झाली होती. बंदी असली तरी 2020 मध्ये 256 आणि 2021 मध्ये 220 वेळा सॅटेलाईट फोनचा वापर करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिली होती. केंद्र सरकारशी समन्वय साधून याविषयी तपास केला जात असल्याचे गृहमंत्र्यांनी सभागृहाला सांगितले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news