टेंभू योजना : घोड्यावर कुणाला बसवायचे हे जनताच ठरवते; आमदार बाबर यांंनी विरोधकांना फटकारले | पुढारी

टेंभू योजना : घोड्यावर कुणाला बसवायचे हे जनताच ठरवते; आमदार बाबर यांंनी विरोधकांना फटकारले

विटा ; पुढारी वृत्तसेवा

आपल्या आजारपणात सुद्धा काहींना आमदार व्हायची स्वप्ने पडली. आता तर कोण कोण कुणाला आमदार करायचाही ठेका घेत आहेत. पण घोड्यावर कुणाला बसवायचे हे तुम्ही-आम्ही नाही तर, जनताच ठरवते, अशा शब्दांत आमदार अनिलराव बाबर यांनी नाव न घेता विट्यातील काही नेतेमंडळीला फटकारले.

खानापूर तालुक्यातील जाधववाडी येथे टेंभू योजनेच्या पाचव्या टप्प्यात गोरेवाडी उजव्या कालव्याच्या पाणी पूजनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे, नगराध्यक्ष डॉ. उदयसिंह हजारे, नीलम सकटे, फिरोज शेख, सदाशिव हसबे सुनंदा जाधव, ज्येष्ठ नेते लालासाहेब पाटील, उपअभियंता अमोल गुरव, प्रमोद होनमाने, शाखा अभियंता माधुरी कोळी, पांडुरंग मुळीक आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

आमदार बाबर म्हणाले, मतदारसंघात रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यात राजकारणाला मी महत्त्व देत नाही. पण जनतेचे आपल्यावरचे प्रेम, काहींना बघवत नाही, त्यामुळे अशी मंडळी फक्त टीका करतात. ज्यांना आम्ही घोड्यावर बसायला मदत केली, तेच मला घोड्यावरून खाली उतरायची भाषा करत आहेत. पण त्यांनी लक्षात घ्यावे की, जनता आपली मालक आहे. कुणाला घोड्यावर बसवायचे आणि कुणाला खाली उतरायचे हे जनताच ठरवते.

ज्या टेंभूबद्दल आपल्यावर सातत्याने टीका करत आहेत, त्या योजनेचे श्रेय एकट्याचे आहे असे आपण कधीच म्हणत नाही. पण ही योजना पूर्ण करण्यासाठी आपले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कष्ट बघून लोकांनीच आपल्या नावापुढे टेंभू योजनेचे जनक ही उपाधी दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत या भागाला पाणी देण्याचा शब्द दिला होता, तो सहाव्या टप्प्याच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. १९९० पासून २०२२ पर्यंतच्या सर्व जलसंपदा किंवा पाटबंधारे मंत्र्यांच्या दालनात आपली पत्रे दिसतील.

या काळात कुणी किती काम केले आहे हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे कोण किती टीका करतो याला आपण महत्व देत नाही. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांना स्वप्नातही मीच दिसत असल्याने टीका केली जात आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात सहाव्या टप्प्याच्या पुढच्या कामांना मंजूरी मिळून लवकरच ती सुरू होतील असेही बाबर यांनी सांगितले.

सुहास शिंदे म्हणाले, आमदार बाबर हेच टेंभूचे पाणी आणणार आम्हाला माहीत होते. त्यांनीच पाणी देऊन या घाटमाथ्याचा दुष्काळ हटवला आहे. कुणी काहीही म्हटले तरी, टेंभूचे श्रेय आमदार अनिलभाऊंचेच आहे. मात्र काहींना आतापासूनच आमदार होण्याची घाई झाली आहे. तर काहींना घोड्यावर बसायची स्वप्ने पडत आहेत. परंतु खानापूर मतदारसंघाला अनिलभाऊशिवाय पर्याय नाही. यावेळी नगराध्यक्ष डॉ. उदयसिंह हजारे, प्रकाश बागल, संभाजी जाधव, संजयशेठ भोसले, धनाजी जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा :

 

Back to top button