Tembhu scheme : ‘टेंभू’च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख | पुढारी

Tembhu scheme : 'टेंभू'च्या गलथान कारभाराविरोधात याचिका दाखल करणार : डी. एस. देशमुख

कडेगाव : पुढारी वृत्तसेवा : टेंभू सिंचन योजनेच्या (Tembhu scheme) आणि कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयर यांच्या गलथान आणि चुकीच्या कारभाराचा फटका नेर्ली खोरा व शाळगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या गलथान कारभाराविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एस. देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी देशमुख म्हणाले, तालुक्यातील शिवाजीनगर येथील टेंभू योजनेच्या (Tembhu scheme) टप्पा क्र.२ येथील एक रोहित्र काढून माहुली येथील टप्पा क्र. ३ मध्ये बसविले. त्यानंतर टप्पा क्र.२ मध्ये बसविलेल्या रोहित्रामध्ये बिघाड झाला. तो दुरुस्त होण्यासाठी बराच कालावधी गेला. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पुरेशा पाण्याअभावी सुर्ली व कामथी कालव्याच्या लाभक्षेत्रातील दहा गावांतील पिके वाळून गेली. मुळात शिवाजीनगर येथील रोहित्र काढून माहुली टप्पा क्रमांक ३ मध्ये बसवण्याचे कारण नव्हते. कार्यकारी अभियंता रेड्डीयार यांच्या मनमानी कारभारामुळे येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे रेड्डीयार व टेंभू विभाग यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.

ते पुढे म्हणाले की, टेंभूचे पाणी शेतकऱ्यांना बांधावर न देता अन्यायकारक पाणीपट्टी वसूल केली जात आहे. मोठे लाभ क्षेत्र असलेल्या नेत्यांची व पुढाऱ्यांची पाणीपट्टी माफ केली जाते. परंतु गोरगरीब शेतकऱ्यांची अन्यायकारक पाणी पट्टी कपात केली जात नाही. पाणीपट्टी कपातीमध्ये मोठे गौडबंगाल आणि भ्रष्ट कारभार होत आहे. पाणी संघर्ष समिती मागील पाच वर्षांपासून सतत टेंभुच्या पाण्यासाठी संघर्ष करीत आहे. अनेक आंदोलने टेंभुच्या भोंगळ कारभाराविरोधात करण्यात आली. समितीच्या अनेक मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन टेंभू विभाकडून देण्यात आले. मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. याच्याविरोधातही पाणी संघर्ष समिती आवाज उठवणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button