बीड : केजमधील महामार्गावर लुटमार करणार्‍या टाेळीला पाच दिवस पोलीस कोठडी | पुढारी

बीड : केजमधील महामार्गावर लुटमार करणार्‍या टाेळीला पाच दिवस पोलीस कोठडी

केज(बीड), पुढारी वृत्‍तसेवा :

 महामार्गावर लुटमार करणार्‍या टाेळीला न्‍यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही टाेळी रात्रीच्या वेळी वाहन अडवून प्रवाशांना मारहाण करून त्‍यांना लुटत हाेती.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ७ मे राेजी पहाटे चाेरट्यांनी मांजरसुंबा ते अंबाजोगाई महामार्गावर सारणी-सांगवी येथे जॅक ठेवले.कार चालकाने ते जॅक घेण्यासाठी कार थांबविली असता दबा धरुन बसलेले सहा ते सात जणांच्या टोळीने चालकाला व गाडीतील इतर लोकांना मारहाण केली. आणि त्‍यांच्याकडील रोख रक्कम व दागीने लुटले होते. यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ५ दिवसानंतर २३ मे रोजी मध्यरात्री दीडच्‍या सुमारास मांजरसुंबा ते अंबाजोगाई महामार्गावरही अशाच प्रकारे चाेरी झाली हाेती.

 शनिवारी (दि.२८, मे) केज तालुक्यातील मस्साजोगजवळ मध्यरात्री या टोळीला अटक केली. सचिन शिवाजी काळे वय (२४ वर्षे रा. पारा ता. वाशी), पापा ऊर्फ काळ्या ऊर्फ आकाश बापु शिंदे (वय २२ वर्षे रा. खोमनवाडी शिवार ता. केज), रामा लाला शिंदे (वय २३ वर्ष रा. नांदुरघाट), दादा सरदार शिंदे (वय ४५ वर्ष रा. नांदुरघाट), विकास ऊर्फ बाबा ज्ञानोबा पवार (वय २२ वर्ष रा. चिंचोली माळी गायरान ता. केज) यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी केज पोलिसांच्या ताब्यात दिले. आज (दि. २९ मे) केज पोलिसांनी आरोपींना अंबाजोगाई येथील न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आराेपींना  दि. २ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाहन चालकाला आमिष दाखवून करायचे लूटमार

आरोपी रात्रीच्या वेळी महामार्गावार जॅक ठेवायचे. जॅक घेण्याचे अमिषाने एखादा चालक आपले वाहन थांबवायचा. ताे खाली उतरला की, दबा धरुन बसलेले आरोपी त्‍यांच्‍यावर हल्‍ला करायचे. तसेच त्‍याच्‍यासह वाहनातील अन्‍य प्रवाशांना मारहाण करत असत. शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम, मौल्यवान वस्तूंची  लुटमार करायचे. या टाेळीतील आराेपींवर यापूर्वी चोरी, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल आहेत. तपास केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील करीत आहेत.

हेही वाचा

 

हेही वाचा 

 

 

Back to top button