पुणे : तृतीयपंथीयांची ‘ओळख’ वाढतेय! जागृतीमुळे ओळखपत्र घेण्याचे प्रमाण वाढले
शिवाजी शिंदे
तृतीयपंथी ही ओळख लपवण्याऐवजी आपली ओळख स्पष्ट करून ओळखपत्र मिळवल्यास अनेक योजनांचा लाभ घेता येऊ शकेल, याची जाणीव तृतीयपंथींत केंद्र शासनाच्या विविध उपक्रमांतून करून देण्यात येत आहे. ज्यामुळे तृतीयपंथी आता ओळखपत्र घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत.
केंद्र शासनाने तृतीयपंथी नागरिकांना नवीन ओळख निर्माण करून देण्यासाठी सुरू केलेल्या नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स या संकेतस्थळावरील नोंदणीस राज्यातील तृतीयपंथी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या काही महिन्यांत सुमारे बाराशे नागरिकांनी या पोर्टलवर अर्ज दाखल केले आहेत.
ऑनलाईन झालेल्या छाननीतून आतापर्यंत शंभरहून अधिक जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर बहुतांश अर्जांची छाननी सुरू असून, त्यांच्या काही कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांनाही काही भावना आहेत याचा विचार कोणीही करताना दिसत नाही. त्यांना अनेक वेळा हीन दर्जाची वागणूक समाजाकडून मिळत असल्याचे दिसून येते. त्यांच्याकडे कौशल्य, बुद्धिमत्ता असते.
त्या दृष्टीने त्यांना नोकरी, व्यावसाय करावयाचा असतो. मात्र, त्यांना ती संधी देण्यात पुढाकार कोणीही घेताना दिसत नाही. परिणामी या नागरिकांना अनेकदा रस्त्यावर भीक मागून पोटाची खळगी भरावी लागते. हीच बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन्स या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
नोकरी, व्यवसायाच्या संधी मिळणार
राज्यातील सर्वच जिल्ह्यांत मागील वर्षीपासून तृतीयपंथी नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास समाजकल्याण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. त्यानुसार तृतीयपंथी नागरिक संकेतस्थळावरून अर्ज भरू लागले आहेत. या नवीन ओळखपत्रामुळे या नागरिकांना नोकरी आणि व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. शिवाय ज्यांच्याकडे विविध प्रकारची कौशल्ये आहेत ती पुढे आणण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रोत्साहन मिळणार आहे.
तीन महिन्यांतील ऑनलाईन अर्जांची संख्या
- पुणे 116
- मुंबई
(उपनगर) 56 - जळगाव 41
- नागपूर 41
- सांगली 48
- ठाणे 48
- सोलापूर 57
- कोल्हापूर 66
- नाशिक 34
- अहमदनगर 34