वाहन चालवल्यामुळे अल्पवयीन मुलांच्या पालकांना दंड | पुढारी

वाहन चालवल्यामुळे अल्पवयीन मुलांच्या पालकांना दंड

हुपरी : वार्ताहर

अल्पवयीन मुलांना मोटारसायकल दिल्यामुळे आज हुपरीतील चार पालकांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी 1 हजार रुपये दंड भरावा लागला. सपोनि नामदेव शिंदे यांनी अल्पवयीन मुलांना मोटारसायकल चालवताना अटकाव करीत त्यांच्या पालकांवर कारवाई केली. इचलकरंजी येथील न्यायालयात जाऊन पालकांना दंड भरावा लागला.

दै. ‘पुढारी’च्या ‘माय कोल्हापूर’ पुरवणीमध्ये ‘मुलांना मोटारसायकल देणे पडणार महागात’ अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मुलांच्या हट्टापायी पालक आपल्या मुलांना वाहने देतात. मात्र, मुले तिब्बल सीट गाडी चालवत धूम स्टाईलने हैदोस घालतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निरपराध लोकांबरोबर त्या अल्पवयीन मुलांनाही त्याचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र, पालक याबाबत अद्याप गंभीर नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज धूम स्टाईलने धुरळा उडवीत वाहन चालवणार्‍या 4 मुलांना सपोनि शिंदे व कर्मचार्‍यांनी पकडले. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घेत इचलकरंजी येथील न्यायालयात मोटर वाहन कायद्यानुसार कारवाईसाठी पाठवून दिले. 

न्यायालयाने या चार पालकांना प्रत्येकी 1 हजार रुपये  दंड केला. तसेच कोर्ट उठेपर्यंत कोर्टातच थांबण्याची शिक्षा दिली. त्यामुळे कोर्ट उठेपर्यंत थांबून त्यांनी दंड भरून यातून सुटका करून घेतली. नागरिकांनी असे कटू प्रसंग टाळण्यासाठी व संभाव्य अपघात थांबवण्यासाठी आपल्या मुलांच्या हाती मोटारसायकल देऊ नये, असे आवाहन सपोनि शिंदे यांनी केले.
 

Tags : Penalties, parents, minor children, drive, motorcycle  

Back to top button