नाशिक : वावी, पांगरी परिसरात पाण्याचे टँकर सुरू करावे : प्रहार | पुढारी

नाशिक : वावी, पांगरी परिसरात पाण्याचे टँकर सुरू करावे : प्रहार

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस न पडल्याने यंदाच्या उन्हाळ्यात विहिरी, बारव कोरड्याठाक पडल्या आहेत. त्यामुळे पांगरी, वावी परिसरात पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली. प्रहारचे कार्यकर्ते व पांगरीतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकांची भेट घेत रिकाम्या घागरी भेट दिल्या व गावाला टँकरद्वारे मुबलक पाणी देण्याची मागणी केली.

तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने, नदी, नाले, विहीर यांना पाणी आलेच नाही. पांगरी व परिसरातील जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी फार हाल झाले आहेत. पांगरी व परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांना पाणी उपलब्ध करण्यासाठी महिला, पुरुषांची वणवण होत आहे. यावेळी टँकर सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत व शासनाला रिकाम्या घागरी, हंडे भेट देण्यात आले. तसेच प्रहार पक्षाच्या वतीने रस्ता रोको व बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला. यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे, उपाध्यक्ष सुनील जगताप, शहराध्यक्ष अमित शिंदे, रमेश लाड, संदीप लोंढे, नीलेश चव्हाण, दीपक पगार, प्रकाश पांगरकर, कविता पगार, कमळाबाई पगार आदी उपस्थित होते.

‘मागेल त्या गावाला पाणी द्या’
तालुक्यात पांगरी, वावीसह, शहा, हरसुले, देवपूर, वल्हेवाडी, घोटेवाडी, सोनारी, लोणारवाडी, भाटवाडी, डुबेरे, मनेगाव, सोनांबे, वडगाव, धारणगाव, पाटोळे, खापराळे, जयप्रकाशनगर, वडगाव, दोडी, गोंदेसह ज्या गावांत पाणी नाही, त्या गावांना टँकर देऊन ग्रामस्थांची तहान भागवावी, अशी मागणी प्रहारच्या वतीने करण्यात आली.

हेही वाचा:

Back to top button